लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:30+5:302021-07-17T04:13:30+5:30
पंचवटीतील बळी मंदिराजवळ राहणारे सुनील सुकदेवराव शेंडगे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे बाहेरगावी ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकास लुटले
पंचवटीतील बळी मंदिराजवळ राहणारे सुनील सुकदेवराव शेंडगे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे बाहेरगावी गेले होते. बुधवारी (दि.१४) ते बळी मंदिर भागात जाण्यासाठी द्वारका सर्कल येथील धुळे थांब्यावर ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करीत थांबले असता, ही घटना घडली. मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी कुठे चाललात, अशी विचारपूस करून आम्हालाही तिकडेच जायचे आहे. चला आपण ट्रिपलसीट जाऊ, असे म्हणत संशयितांनी शेंडगे यांना दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. यानंतर, कन्नमवार पुलाखाली नेऊन शेंडगे यांना मारहाण करीत भामट्यांनी त्यांच्या खिशातील अडीच हजाराची रक्कम, घड्याळ व हातातील बॅग असा सुमारे ४ हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला.
--------------
टोळक्याच्या मारहाणीत तरुण जखमी
नाशिक : हॉटेलमधून जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोघा मित्रांना परिचित टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी रोड भागात घडली. या घटनेत लाकडी स्टम्पचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाघ, हृषिकेश धात्रक, जयंत अग्रवाल व गोविंद नामक तरुण अशी तरुणास मारहाण करणाऱ्या परिचितांची नावे आहेत. या प्रकरणी निशांत प्रवीण मोरे या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. मोरे हा रविवारी (दि.११) रात्री मित्र शुभम कोकणी याच्यासमवेत जेवणासाठी परिसरातील हॉटेलमध्ये गेला होता. जेवण आटोपून दोघे मित्र घराकडे परतत असताना ही घटना घडली. हिरावाडी भागातील पाटाच्या रोडने ते जात असताना मीनाताई स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराजवळ चार जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले व आम्हाला पाहून का पळाले, असा जाब विचारत, दोघा मित्रांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी स्टम्पने बेदम मारहाण केली.
------
गंगाघाटावर कोयताधारी जेरबंद
नाशिक : गंगाघाटावर धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला आहे.
प्रताप उर्फ बब्बी अशोक खाकोडीया (२७ रा.गणेशवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास गोदाघाट परिसरात दिनदिक्कतपणे एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पंचवटी पोलिसांनी धाव घेतली असता, संशयितास गोदावरी हॉटेल समोर बेड्या ठोकण्यात आल्या. संशयिताच्या ताब्यात कोयता मिळून आला असून, अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.