नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे साडेतीन हजार कर्जदारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरल्यामुळे जिल्हा बॅँकेला त्यापोटी शासनाने ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यात शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते व त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांनी दीड लाखाव्यतिरिक्तचे पैसे भरण्यासाठी वनटाईम सेंटलमेंटचा प्रस्तावही ठेवला होता. त्यानुसार नाशिक जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज घेतलेले, परंतु थकबाकीदार झालेल्या दीड लाखापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या ३५०१ सभासदांनी दीड लाखाच्या वरील कर्जाची रक्कम भरल्यामुळे त्यांचे दीड लाखांचे कर्ज माफ झाले आहे. या कर्जापोटी जिल्हा बॅँकेस ५२ कोटी ३२ लाख रुपये शासनाने अदा केले आहेत. या योजनेत पात्र असलेल्या उर्वरित शेतकरी सभासदांनी ३१ मार्चच्या आत सहभागी होऊन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे.
साडेतीन हजार कर्जदारांची वनटाइम सेटलमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:35 IST