उड्डाणपुलावरील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:09 IST2019-10-30T23:51:35+5:302019-10-31T00:09:00+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणारी कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उड्डाणपुलावरील अपघातात एक ठार
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणारी कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास पाथर्डी फाट्याजवळ उड्डाणपुलावर हा अपघात घडला. देवेंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग (३१, रा. आदिलनगर, लखनऊ) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. तसेच जितेंद्रसिंग, सरिता चव्हाण, राखी सिंग व आयुष सिंग हे चौघे गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवासी लखनऊ येथून नाशिककडे येत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर त्यांची भरधाव इनोव्हा कार (यूपी ३२, एमएम २०५०) चालविणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जाऊन धडकली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना भानुप्रताप यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
चारचाकीमधून म्युझिक सिस्टीम चोरी
नाशिकरोड जयभवानीरोड येथे इनोव्हा गाडीच्या दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने ४५ हजार रुपये किमतीचा टच स्क्रीन डिस्प्ले व म्युझिक सिस्टम चोरून नेली. जयभवानीरोड औटेनगर स्वामी प्रसाद बंगला येथे राहाणारे संजय माधवराव इनोव्हा कारही बंगल्याच्या पाठीमागे उभी केली होती. गायकवाड हे इनोव्हा गाडीकडे गेले असता त्यांना दरवाजाची काच फोडलेली आढळली. चोरट्याने इनोव्हा गाडीच्या दरवाजाची काच फोडून डॅश बोर्डवरील टच स्क्रीनचा डिस्प्ले व म्युझिक सिस्टम असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला.
दुकान फोडून माल लंपास
उपनगर सिंधी कॉलनी येथील साई कलेक्शन कापड दुकानाचा पत्रा उचकटवून अज्ञात चोरट्याने ३४ हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले.
शिखरेवाडी स्वामीसमर्थ मंदिराजवळ राहाणारे मनिष नंदलाल थवानी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उपनगर सिंधी कॉलनी झुलेलाल मंदिरासमोर साई कलेक्शन नावाचे कापड खरेदी-विक्रीचे दुकान आहे.
गेल्या शुक्रवारी रात्री थवानी यांनी दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा उचकटवून दुकानात प्रवेश केला. दुकानातील तीन बॉक्स टी-शर्ट, ३० जीन्सच्या पॅँट, ६० शर्ट, २० ट्राऊजर पॅन्ट, ३० फुलशर्ट असा एकूण ३४ हजार रुपयांचे कपडे चोरून नेले.
थवानी हे शनिवारी सकाळी दुकान खोलण्यास आले असता त्यांना दुकानाचा पत्रा कापून चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून पडून
महिला ठार
दुचाकीवरून प्रवास करताना एक वृद्ध महिला तोल जाऊन जव्हार रस्त्यावर अंबोली फाट्याजवळ खाली कोसळली. या अपघातात जैनाबाई सखाराम शेवरे (६०, रा. आमलोण, ता. पेठ) या सोमवारी दीपावलीनिमित्त मुलगा पुनाजी शेवरे याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जव्हारच्या दिशेने प्रवास करत होत्या.
अंबोली फाटा येथे खड्ड्यात दुचाकी आदळल्याने जैनाबाई यांचा तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. जैनाबाई यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी चौकशी सुरु असून अधिक तपास करण्यात येत आहे.
दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुचाकी अपघातात जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मच्छिंद्र भीमराव पवार (३४, रा. नायगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पवार यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.