रायगडनगरजवळील अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:13 IST2021-05-25T15:12:48+5:302021-05-25T15:13:13+5:30
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई महामार्गावरील रायगडनगर येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला.

रायगडनगरजवळील अपघातात एक जण ठार
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई महामार्गावरील रायगडनगर येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री (दि.२४) ११.४५ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे नाशिकहून-मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना बुलेट मोटारसायकल (क्र. एम.एच.१५, एफ.बी. ९९००)वरील सचिन जाधव (कामटवाडे, नाशिक) या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे चालक गाडीसह दुभाजकावर आदळल्यामुळे रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती गोंदे फाटा येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमीला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु काही वेळातच सचिन जाधव यास मृत घोषित करण्यात आले. विल्होळी ते मुंढेगावदरम्यान अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. यानंतर वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून, अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.