जुन्या घराची जीर्ण झालेली भिंत कोसळून मजूर ठार एक जखमी : पंचवटीच्या सरदार चौकात दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:04 IST2017-10-25T16:52:27+5:302017-10-25T17:04:04+5:30

जुन्या घराची जीर्ण झालेली भिंत कोसळून मजूर ठार एक जखमी : पंचवटीच्या सरदार चौकात दुर्घटना
नाशिक : पंचवटी परिसरातील सरदार चौकात जलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदाराच्या वतीने मजूरांमार्फत खोदकाम केले जात होते. दरम्यान, एका घराची जुनी जीर्ण झालेली भींत कोसळल्याने त्याखाली दबून सोमनाथ भागीनाथ गाढवे या मजुराचा मृत्यू झााला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठेकेदार श्रीराम बन्सी जाधव (५६, रा. काळाराम मंदीर परिसर) यांनी या भागातील एका मंगल कार्यालयाच्याजलवाहिनीचे काम पुर्ण करण्यासाठी खोदकाम गोटीराम डंबाळे (३०) व गाढवे यांच्या मदतीने सुरू केले. यावेळी येथील एका घराची जुनी भींत कोसळण्याचा धोका जाधव यांच्या लक्षात येऊनदेखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत कोणत्याहीप्रकारचे सुरक्षा साधने पुरविली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. खोदकाम करत असताना अखेर भींत कोसळली. भींतीच्या मलब्याखाली दबून गाढवे यांचा मृत्यू झाला तर डंबाळे जखमी झाले आहेत. भींत कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने तत्काळ गाढवे व डंबाळे यांना बाहेर काढण्यात आले व दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकाºयांनी गाढवे यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी डंबाळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात जाधवविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.