ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:36 IST2021-04-23T05:36:23+5:302021-04-23T05:36:34+5:30

नाशिकच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास

Offensive homicide in oxygen leak | ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा



लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजनच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय 
यांनी घटनेची गंभीर दखल घेत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना प्रत्यक्षदर्शी म्हणून फिर्याद देण्यास सांगितले. 
भारतीय दंड विधान कलम-३०४(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीमधून 
गळती लागल्याने झाला असून, 
यात संबंधितांचा निष्काळजीपणा 
व हलगर्जी झाल्याचे फिर्यादीत 
म्हटले आहे.
महापालिकेच्या स्तरावरही दुर्घटनेची चौकशी होणार
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाबाधितांचे बळी गेल्यानंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असले तरी नाशिक महापालिकेच्या स्तरावरदेखील चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

चौकशी समितीला 
पंधरा दिवसांची मुदत
दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला चौकशी पूर्ण करून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून, समितीने आपला अहवाल तत्काळ शासनाला सादर करावा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 

Web Title: Offensive homicide in oxygen leak