निमित्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 01:50 IST2017-06-11T01:50:14+5:302017-06-11T01:50:14+5:30
लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन

निमित्त
- रविप्रकाश कुलकर्णी
लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन वर्तमानपत्रातून वा त्यांच्या पुरवण्यातून प्रसिद्ध होत असतं. अशापैकीच रामदास खरे हे एक नाव. अर्थात ‘लोकमतच्या वाचकांना’ हे नाव अपरिचित नक्कीच नाही. कारण गेली दीड-दोन वर्षं लेखक आणि त्यांच्याशी झालेला पत्रसंवाद सांगणारं त्यांचं सदर ‘पत्रास कारण की’ वाचकांना चांगलंच आवडलेलं आहे.
पण रामदास खरे हे भाग्यवान आहेत. त्यांचं सदर चालू असतानाच त्यांच्या या लेखनाचं पुस्तक ‘कॅलिडोस्कोप’ या नावाने व्यास क्रिएशनतर्फे प्रकाशित झालं आहे.
अर्थात वृत्तपत्रातील सदर म्हटलं की, त्याला मर्यादित जागा असते. तसं खरं त्याच्याबाबतीतदेखील झालं असणार. पण हे लेखन ग्रंथबद्ध होत असताना मात्र रामदास खरे यांनी त्यात भर घातलेली आहे. त्यामुळे सदर पुस्तकात अनंत देशमुख यांची आस्वादक प्रस्तावना आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘खरे यांच्या ठिकाणी एका बाजूने त्या त्या लेखकाविषयीचा असलेला आदरभाव आणि दुसऱ्या बाजूला ज्या वाचकांसाठी आपण हा सारा लेखनाचा खटाटोप करत आहोत त्याला तो समजावा म्हणून आलेल्या साध्या सुलभ भाषेतील निवेदन दोन्ही दिसून येतात. म्हणूनच कॅलिडोस्कोपचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. क्षणार्धात वाचक त्यात गुंतून जातो ही खरी यांची कमाई आहे. मात्र यासंदर्भात काही गोष्टींकडे लक्ष वेधतो. रामदास खरे यांना पहिलं पत्र १९९४ मध्ये आलं. त्या अवस्थेचं ते वर्णन करतात, ...आणि मात्र स्वर्ग फक्त दोन बोटे उरला. गुलजार यांच्या आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे... या गाण्यातल्या ओळीप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. पुढे लेखक, कवी यांना पत्र पाठविण्याचा सिलसिला आणि धडाका सुरू झाला. तो अगदी २००२ पर्यंत.
रामदास खरे यांच्या सदरात ते ज्या लेखकाबद्दल लिहायचे त्याचं उत्तम चित्र सोबत असायचं. किंबहुना त्या चित्रामुळेदेखील लक्ष वेधलं जायचं. मुळात आपल्याकडे लेखकाचा फोटो असणं आणि तो छापणं फार दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात तो सुंदर वगैरे असणं तर फारच दूरची गोष्ट आली. ही चित्रं लेखासोबत पुस्तकात आली असती तर किती बरं झालं असतं. त्याऐवजी लेखकाचे पोस्टाच्या तिकिटाएवढे फोटो लावले आहेत. कदाचित त्यामागे काही व्यावहारिक कारणही असू शकेल. पण यानिमित्ताने त्या चित्रकलेची नोंद आली असती तर बरं झालं असतं. यानिमित्ताने मी त्या चित्रकाराला जाहीर दाद देतो. रामदास खरे यांनी लिहिलेल्या पत्रांचा हा ठेवा मात्र कायमच स्मरणात राहील.