नायलॉन मांजात अडकून २८ पाखरांचे कापले पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:59 AM2019-01-21T00:59:25+5:302019-01-21T00:59:57+5:30

आठवड्यापूर्वी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले; मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार?

 Nylon Stuck Fingers 28 Pieces Cut Off Feathers | नायलॉन मांजात अडकून २८ पाखरांचे कापले पंख

नायलॉन मांजात अडकून २८ पाखरांचे कापले पंख

Next

नाशिक : आठवड्यापूर्वी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले; मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. नायलॉन मांजावर बंदी लादली गेली असली तरी संक्रांतीपासून अद्याप नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत असून, पाखरांचा जीव टांगणीलाच असल्याचे चित्र दिसते. आतापर्यंत २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत.
तीळगूळ वाटप करत मकरसंक्रांतीचा गोडवा अधिकाधिक वृद्धिंगत केला जातो. हा सण नव्या इंग्रजी वर्षाच्या पहिल्या महिन्यात येत असल्यामुळे संपूर्ण वर्षभर विविध नातेसंबंधात गोडवा टिकून रहावा, यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या मित्र-परिवाराला तीळगूळ देत गोड बोलण्याची साद घालतो. या सणाच्या औचित्यावर पतंगबाजीचा उत्साह शहरात चांगलाच पहावयास मिळाला. चोरीछुप्या पद्धतीने वापरलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षी जायबंदी होण्याच्या घटना संक्रांतीच्या पूर्वसंध्येपासूनच वाढल्या आहेत. नायलॉन मांजा तुटून झाडांवर अडकतो आणि एकप्रकारे हा पक्ष्यांसाठी ‘सापळा’ ठरतो. या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले. शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षिमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. शहरात तब्बल २८ ते ३० पक्ष्यांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले. अशा दुर्घटना घडू नये याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
तेरा कबुतर जखमी; तीन मृत्युमुखी
मकरसंक्रांतीपासून नायलॉन मांजाचा वापर अधिकाधिक वाढल्यामुळे १३ कबुतर (पारवा) जायबंदी झाल्याची घटना शहरात घडली. यामध्ये तीन कबुतर जागीच गतप्राण झाले. आठवडाभरात २८ ते ३० पक्षी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमी पक्ष्यांमध्ये कबुतर, गायबगळा, करकोचा, घुबड, कोकीळ, घार आदी पक्ष्यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

Web Title:  Nylon Stuck Fingers 28 Pieces Cut Off Feathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.