Nylon Cage Trap: Weekly Failure For 28 birds | नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी
नायलॉन मांजाचा सापळा : आठवड्यात २८ पाखरे जायबंदी

ठळक मुद्देशहरात २८ ते ३० पक्ष्यांचा जीव वाचविण्यास यश घटना वर्षभर सुरूच राहणार असल्याची भीती पाखरांचा जीव टांगणीलाच

नाशिक : मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले, मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. नायलॉन मांजावर बंदी लादली गेली असली तरी संक्रांतीपासून अद्याप नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत असून, पाखरांचा जीव टांगणीलाच असल्याचे चित्र दिसत आहे.
तीळगूळ वाटप करत मकरसंक्रांतीचा गोडवा अधिकाधिक वृद्धिंगत केला जातो. हा सण नव्या इंग्रजी वर्षाच्या पहिल्या महिन्यात येत असल्यामुळे संपूर्ण वर्षभर विविध नातेसंबंधात गोडवा टिकून रहावा यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या मित्र-परिवाराला तीळगूळ देत गोड बोलण्याची साद घालते. या सणाच्या औचित्यावर पतंगबाजीचा उत्साहदेखील शहरात चांगलाच पहावयास मिळाला. चोरीछुप्या पद्धतीने वापरलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षी जायबंदी होण्याच्या घटना संक्रांतीच्या पूर्वसंध्येपासूनच वाढल्या आहेत. नायलॉन मांजा तुटून झाडांवर अडकतो आणि एकप्रकारे हा पक्ष्यांसाठी ‘सापळा’ ठरतो. या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षीमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. शहरात तब्बल २८ ते ३० पक्ष्यांचा जीव वाचविण्यास त्यांना यश आले. तसेच काही पक्ष्यांची सुटका महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी हायड्रोलिक शिडीच्या सहाय्याने केली. नायलॉन मांजा वातावरणात तत्काळ कुजत नसल्यामुळे झाडांना अडकलेल्या या मांजामध्ये पक्षी फसण्याच्या घटना वर्षभर सुरूच राहणार असल्याची भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Web Title: Nylon Cage Trap: Weekly Failure For 28 birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.