लर्निंग लायसन्स मिळणार घरबसल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:19 IST2021-06-11T17:15:34+5:302021-06-11T17:19:55+5:30
लर्निंग लायसन्स तसेच नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया या सेवा देण्याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. शिकाऊ लायसन्स तसेच वाहनांच्या नोंदणीसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

लर्निंग लायसन्स मिळणार घरबसल्या
नाशिक : केंद्र शासनाने आधार क्रमांकावर आधारित फेसलेस सेवा सुरू केली असून, या प्रणालीच्या माध्यमातून परिवहन विभागाने दोन सेवा कार्यान्वित केल्या आहेत. त्यानुसार आता लर्निंग लायसन्स काढणे अगदी सुलभ होणार आहे. नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायसन्सची चाचणी देता येणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
आरटीओ कार्यालयातील दलालांचा हस्तक्षेप करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी अजूनही दलालांच्या माध्यमातूनच अनेक कामे करावी लागत आहेत. संकेतस्थळावरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी संपूर्ण दिवस लागतोच. संकेतस्थळावरील माहिती भरतानाही अनेकदा अडचणी येतात. अनेकांना माहिती भरणे जमत नसल्याने त्यांना अशा मध्यस्थांची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे अजूनही आरटीओ कार्यालयाच्या आवारात लॅपटॉप घेऊन बसलेले अनेक दलाल दिसून येतात.
केंद्र शासनाच्या फेसलेस उपक्रमाच्या माध्यमातून या प्रकाराला आता आळा बसणार आहे. लर्निंग लायसन्स तसेच नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया या सेवा देण्याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. त्यामुळे शिकाऊ लायसन्स तसेच वाहनांच्या नोंदणीसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.