Now on several groups, 'Only Admin ...' | आता अनेक ग्रुपवर ‘ओन्ली अ‍ॅडमिन...’
आता अनेक ग्रुपवर ‘ओन्ली अ‍ॅडमिन...’

ठळक मुद्देसावधगिरी : निवडणुकीच्या तोंडावर काळजी

नाशिक : निवडणुकांबाबतचा अधिकृत प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर समाज- माध्यमांवरदेखील प्रचार संपुष्टात आलेला दिसला. तरी देखील कुणी समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रचाराचे मेसेज किंवा फोटो टाकल्यास किंवा काही वादग्रस्त मजकूर टाकल्यास ते प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये, यास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अनेक अ‍ॅडमिननी त्यांचे ग्रुप शनिवारपासूनच ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड द मेसेज’ या मोडवर आणून ठेवले आहेत.
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून समाजमाध्यमांवर उमेदवारांच्या बाजूने आणि प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात अशा प्रचाराचा पाऊस पडत होता. कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिवस-रात्र पोस्ट, व्हिडीओ टाकत प्रचारात आघाडीवर होते. त्याशिवाय प्रचाराच्या वॉर रूम आणि उमेदवारांनी नेमलेले समाज माध्यमवीर यांनी अक्षरश: प्रत्येक गु्रपवार रतीब घालणे सुरू केले होते. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला, तसा समाज माध्यमांवरील प्रचाराचा धुमाकूळ वाढला होता.
जाहीरप्रचाराची मुदत संपल्यानंतर मात्र सोशल माध्यमांवरील प्रचारालाही आळा बसलेला दिसून आला.
निवडणुक यंत्रणांनीही याकडे बारकाईने लक्ष ठेवले असल्याने कुणीही याबाबत धाडस केले नाही. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपच्या अ‍ॅडमिन्सनी धोका टाळण्यासाठी काळजी घेतलेली दिसून आली.
दक्षता घेतलेली बरी!
बहुतांश सुजाण नागरिकांनी अखेरच्या दोन दिवसांत प्रचाराची पोस्ट टाकण्याचे टाळले. मात्र, चुकून एखादी प्रचाराची पोस्ट कुणी टाकलीच आणि ते प्रकरण वाढत जाऊन वाद निर्माण झाला तर ते आपल्या अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक अ‍ॅडमिनकडून आता वेळीच दक्षता घेतलेली बरी, असे म्हणत अनेक गु्रप पुढील दोन दिवसांसाठी ओन्ली अ‍ॅडमिनच्या मोडला टाकले गेले आहेत. निवडणुक यंत्रणेने घेतलेल्या काळजीचेच हे यश म्हटले जात आहे.


Web Title: Now on several groups, 'Only Admin ...'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.