आता 'रेस्क्यू' केलेल्या बिबट्यांसाठी 'लॉकअप'; वनविभागाचा मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:23 IST2026-02-24T12:22:14+5:302026-02-24T12:23:17+5:30
Leopard Attack: वनखात्याच्या जागेवर ३३ मोठ्या पिंजऱ्यांच्या (एन्क्लोजर) निर्मितीचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

आता 'रेस्क्यू' केलेल्या बिबट्यांसाठी 'लॉकअप'; वनविभागाचा मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय
नाशिक : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून लहान पिंजरे लावून बिबट्यांना 'रेस्क्यू' केले जाते; मात्र यानंतर हे बिबटे सोडायचे कोठे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे सध्या उभा राहिला आहे. यावर मात करण्यासाठी नाशिक वनविभागाने बिबट्यांसाठी एकप्रकारचे 'लॉकअप' उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
वनखात्याच्या जागेवर ३३ मोठ्या पिंजऱ्यांच्या (एन्क्लोजर) निर्मितीचे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
'टीटीसी' मध्ये दहा पिंजरे
म्हसरूळ येथील ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर (टीटीसी) या वन्यप्राणी उपचार केंद्राची क्षमतादेखील वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी शिल्लक जागेमध्ये दहा मोठे पिंजरे एन्कोलोजरसह उभारण्यात येणार आहेत.
या सहा तालुक्यांची निवड
नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी, येवला (ममदापूर), दिंडोरी (वणी खुर्द) या तालुक्यांमध्ये मोठे पिंजरे तयार करण्यात येणार आहेत.