आता प्रभाग समित्यांवर नेमणार अशासकीय सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:53 IST2019-01-24T00:52:57+5:302019-01-24T00:53:18+5:30
महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी कार्यवाही सुरू झाली असून, नगरसचिव विभागाने विभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.

आता प्रभाग समित्यांवर नेमणार अशासकीय सदस्य
नाशिक : महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी कार्यवाही सुरू झाली असून, नगरसचिव विभागाने विभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने ही कार्यवाही सुरू असली तरी सध्या विभागीय अधिकारी आणि अन्य अधिकाºयांच्या अधिकारात वाढ करण्यात आल्याने कोणत्याही समितीवर प्रशासकीय मंजुरीचे विषयच नसल्याने अगोदरच नगरसेवक त्रस्त असताना अशासकीय सदस्य नियुक्त करून काय उपयोग असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने प्रभाग समित्यांचे गठन केल्यानंतर नाशिक महापालिकेत १९९७ मध्ये प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. त्यानंतर सहा विभागातील सर्व प्रभागातील संबंधित प्रभागांचा त्यात समावेश करण्यात आला. या समित्यांमध्ये नगरसेवक सदस्य तेच पदसिद्ध असतात. केवळ दरवर्षी अध्यक्षपदाचीच निवडणूक होत असते. दरम्यान, पहिल्या वेळेपासूनच प्रभाग समित्यांवर तज्ज्ञ अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी महापालिकेने त्यात फार लक्ष घातले नव्हते. राजकीय पक्षांनीदेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली त्यावेळी प्रभाग समिती सदस्य नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या होत्या, नंतर हा प्रस्ताव बारगळला. परंतु आता पुन्हा या विषयावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने सर्व विभागीय अधिकाºयांना पत्र पाठवले असून, जाहिरात प्रसिद्ध करून रीतसर नावे मागविण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच याबाबत कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सर्वच प्रभाग समित्यांवर कोणतेच विषय नसल्याने नगरसेवक संतप्त होत असून, तसे असेल तर प्रशासन सभाच कशाला बोलवते, असा प्रश्नही नगरसेवक करीत आहे. सातपूर येथील प्रभाग समितीच्या बैठकीत तर नगरसेवकांनी बहिष्कार टाकण्याचीदेखील चर्चा करण्यात आली. प्रभाग समित्यांना अधिकार नसल्याने बैठकीत घंटागाडी, कचरा आणि तत्सम विषयांवर केवळ निष्फळ चर्चा होते. समित्यांचे महत्त्वच संपुष्टात आल्याने सध्या समिती सदस्यच त्रस्त आहे. त्यात आणखी सदस्य काय काम करणार, असा प्रश्न केला जात आहे.