मनपा हद्दीत नाही जागेचा ‘भरोसा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST2018-08-31T23:23:40+5:302018-09-01T00:16:57+5:30
महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे.

मनपा हद्दीत नाही जागेचा ‘भरोसा’
नाशिक : महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे. महिलांवर घराबाहेर होणारी छेडखानी आणि होणारे हल्ले नवीन नाही. त्याचबरोबर अनेकदा घरातही महिलांवर अत्याचार होत असतात. महिलांवर अशाप्रकारचे अत्याचार होत असताना त्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि न्याययंत्रणेसह तब्बल अकरा शासकीय यंत्रणा एकत्र आणून नागपूरमध्ये भरोसा हा प्रकल्प राबविला असून, महिलांवरील अत्याचाराबाबत चोवीस तासांत दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यासंदर्भात गेल्या डिसेंबर महिन्यात राज्यातील महिला आमदारांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना या प्रकल्पाचे कामकाज दाखविल्यानंतर आपापल्या मतदारसंघात अशाच प्रकारचा प्रकल्प राबवावा अशाप्रकारची सूचना फडणवीस यांनी केली, त्यानुसार आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये कार्यशाळा घेतली. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल या कार्यशाळेस उपस्थित होते. त्यांना आणि न्यायाधीशांनादेखील कल्पना रुचली.
गेल्या डिसेंबर महिन्यात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पासाठी भालेकर हायस्कूलमध्ये जागा मागितली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला आणि ही जागा महापालिकेने नाकारली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना या जागेवर सेंट्रल लायब्ररी करण्याची तयारी केल्याचे सांगण्यात आले. आमदार फरांदे यांनी या केंद्रासाठी हुंडीवाला लेन येथील मनपा शाळेची इमारत मागितली; परंतु तीदेखील अद्याप मिळालेली नसून हा प्रकल्प रखडलेला आहे.
‘भरोसा’ प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी मी दोन जागा सुचविल्या. त्यापैकी भालेकर शाळेतील वर्ग मिळू शकले नाही, त्यामुळे दुसरी जागा सुचविण्यात आली. हुंडीवाला लेन येथील जागा आठ महिन्यांपासून मिळू शकलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला अधिकृत पत्र देऊनही जागा न मिळाल्याने प्रकल्प उभा राहू शकला नाही.
- आमदार देवयानी फरांदे