नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन काही जमेना; ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:38 IST2025-03-14T07:37:55+5:302025-03-14T07:38:33+5:30
विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे.

नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन काही जमेना; ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार
नवी दिल्ली : नोकरी व खासगी आयुष्य यात योग्य संतुलन साधता येत नसल्यामुळे भारतातील ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार झाले आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. दीर्घकाळपर्यंत तणावाखाली राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवर निर्माण होणाऱ्या थकव्यास 'बर्नआउट' असे म्हटले जाते.
न्यूयॉर्कमधील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रातील 'वर्टेक्स' समूहाने भारतात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष हाती आला आहे.
विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांनुसार बदलण्याची गरज आहे. सप्ताहाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा टाकला जाता कामा नये.
कामाचे तास वाढल्यामुळे उत्पादकता घटतेय!
सर्वेक्षणात असे आढळून आले की, कर्मचारी ८ ते २ तासांच्या शिफ्टमध्ये काम करीत असले तरी त्यातील केवळ २.५ ते ३.५ तासच उत्पादक असतात. कामाचे तास वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता व रचनात्मकता मोठ्या प्रमाणात कमी होते
सध्याच्या तंत्रज्ञान केंद्रित कालखंडात कामाचे तास वाढविण्याऐवजी उत्पादकता वाढविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
काय करायला हवे?
तुमच्या कामाबद्दल मोकळेपणाने बॉसशी बोला. तुम्हाला कोणत्या कामातून आनंद मिळतो हे बॉसला सांगा. बॉसशी सतत संवाद साधा. कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करा. कामात एका तासानंतर ब्रेक घ्या. ऑफिसच्या बाहेरही आनंद देणाऱ्या गोष्टी शोधा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. कधी कधी काहीही न करणेही आवश्यक असते हे लक्षात घ्या.