शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:12 IST2019-07-13T15:09:50+5:302019-07-13T15:12:22+5:30
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच ...

शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच भागांवर सध्या ‘निर्भया’ लक्ष ठेवून आहे. निर्भयाशी अधिकाधिक महिला, युवतींनी जोडले जावे यासाठी शाळा-महाविदयलयांमध्ये पोहचवून पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथकांकडून उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पोलिसांचे निर्भया पथक क्रमांक-३ने सिडको परिसरातील जनता विद्यालयाच्या शालेय मुलांच्या दिंडीत सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून परिसरात फेरफटका मारून महिलांसोबत पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्यांना माहितीपत्रके वाटप केली.
दरम्यान, जनता विद्यालयाच्या शाळकरी आषाढी दिंडीत निर्भया पथक क्रमांक-३च्या उपनिरिक्षक छाया देवरे, तेलूरे, कावेरी गांगुर्डे आदिंनी सहभागी होऊन परिसरातून फेरफटका मारला. शाळकरी दिंडीत महिला पोलिसांचा सहभाग लक्षवेधी ठरला. दिंडीच्या अग्रभागी निर्भया पथकाची माहिती देणारा फलक विद्यार्थ्यांनी हाती धरला होता. यावेळी परिसरातील रहिवाशी महिलांना माहितीपत्रके देत पोलीस महिलांकडून ‘निर्भया’संकल्पना समजावून दिली जात होती. माहिती पत्रकांवर निर्भयाची मदत कधी, कोठे, कोणाला घेता येईल या बाबतची माहिती देण्यात आली होती. तसेच संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आले होते.