Niphad 0.5 degrees Celsius; The dots also froze | निफाड २.४ अंश सेल्सिअस; दवबिंदूही गोठले

निफाड २.४ अंश सेल्सिअस; दवबिंदूही गोठले

नाशिक : नाशिकमध्ये सलग दोन दिवस सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, निफाड तालुक्यात तर २.४ अंश तापमान नोंदवले गेले आहे. गोदाकाठावरील गावांमध्ये दवबिंदूंचा बर्फ झाला होता. नाशकात तापमानात शुक्रवारी तीन अंशाने घट होऊन ते ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना अक्षरश: हुडहुडी भरली होती.
नववर्षाच्या प्रारंभापासूनच नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीचा अनुभव नाशिककरांनी शुक्रवारी घेतला. गुरुवारपासूनच वाढत्या थंडीबरोबर गार वारेदेखील वाहू लागल्याने थंडीच्या बोचरेपणात वाढ झाली होती. ग्रामीण भागांमध्ये चूल आणि शेकोट्यांची ऊब घेऊन थंडीपासून बचाव करावा लागत होता. जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीने किमान तापमानात घट झाली होती. निफाड तालुक्यातील कुंदेवाडीच्या गहू संशोधन केंद्रावरील तापमापकात शुक्रवारी पहाटे २.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्याने निफाड, नाशिक आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रचंड थंडीचा सर्वांत मोठा फटका द्राक्ष पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यात द्राक्ष मण्यांना तडे जाणे, पाने सुखणे, मुळ्यांची क्षमता घटणे असे प्रकार झाल्यास त्यामुळे द्राक्षबागांना धोका होऊ शकतो. शेतकऱ्यांनी बागेत चारा पेटवून उष्णता तयार करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात कमी तापमानाची परंपरा
नाशिक जिल्ह्यात वर्षभरातून किमान दोन-तीन दिवस राज्यातील सर्वांत कमी तापमान नोंद होण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली आहे. गतवर्षी २५ जानेवारीला ४.६ इतक्या कमी तापमानाची, तर १२ जानेवारी २०१७ ला ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून किमान दोन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Niphad 0.5 degrees Celsius; The dots also froze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.