निफाड शिवसेनेची प्रांत कार्यालयासमोर घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 16:19 IST2023-08-21T16:19:18+5:302023-08-21T16:19:32+5:30
केंद्र सरकारने याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास दि.२५ पासून प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

निफाड शिवसेनेची प्रांत कार्यालयासमोर घोषणाबाजी
निफाड (नाशिक) : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात चाळीस टक्के वाढ केल्याने या निर्णयाविरोधात निफाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी निफाड प्रांत कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, मंत्रालय राज्य बियाणे उपसमिती सदस्य खंडू बोडके, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. शासकीय विश्रागृहापासून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांना यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्कवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले. या निवेदनात केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी अवाजवी निर्यात शुल्काचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नावाने सडलेल्या कांद्याच्या छोट्या गोण्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. केंद्र सरकारने याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास दि.२५ पासून प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनावेळी शरद कुटे, नगरसेवक मुकुंद होळकर, संजय धारराव, संजय कुंदे, आनंद बिवलकर , ललित गिते, सोमनाथ पानगव्हाणे, नंदू पवार, बाळासाहेब पावशे, सुभाष आवारे, सागर जाधव, नंदू निरभवणे, मोहन जगताप, सुनील वडघुले, भाऊ घुमरे, दत्ता नागरे , सचिन नागरे, किरण धारराव, युवराज वडघुले, सोनू निर्भवणे, गणेश वडघुले, सतीश नागरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.