भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी नवाच चेहेरा शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:56 IST2019-07-29T00:55:53+5:302019-07-29T00:56:13+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी नवाच चेहेरा शक्य
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडीच्या वेळी ज्या पद्धतीने उद्धव निमसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली त्याच धर्तीवर नवे नाव अचानक दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
भाजपात एक व्यक्ती एक पद अशी पूर्वी पद्धत होती आता तसे नसले तरी जे आमदार आहेत आणि शहराध्यक्षदेखील आहेत अशांकडील शहराध्यक्षपद किंवा जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात येणार आहे. नाशिकमध्ये शहराध्यक्ष पद आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असून, त्यांनादेखील पर्याय शोधला जात आहे. मध्यंतरी माजी शहराध्यक्ष विजय साने, महेश हिरे, सुनील केदार, उत्तमराव उगले यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नाही. साने यांच्या नावाविषयी बऱ्यापैकी अनुकूलता असली तरी नवा चेहेरा हाच निकष लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत. प्रदेशाध्यक्षपद रावसाहेब दानवे असताना अनेकांनी शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी व्यूहरचना केली होती. त्या आधारे अनेकांची नावे सांगितली जात असताना आता मात्र भाजपाचे अंतर्गत राजकारणदेखील बदलले आहे. विशेषत: भाजपाच्या प्रदेशाध्यपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्यानंतर परिस्थिती आणखी बदलू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गणेश गिते यांचे नाव सुरुवातीपासून चर्चेत होेते आणि पालकमंत्र्यांचीदेखील त्यांच्या नावाला अनुकूलता होती, असे सांगितले गेले. परंतु धक्कातंत्राचा वापर करीत उद्धव निमसे यांचे नाव अंतिम झाले. त्यामुळे आता शहराध्यक्ष पदासाठीदेखील अशाच प्रकारे वेगळे नाव येऊ शकते, असे भाजपाचे सूत्र सांगत आहेत.
ठेकेदाराचे नावही चर्चेत
रावसाहेब दानवे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर आणखी काही इच्छुकांना घुमारे फुटले आहेत. एक ज्येष्ठ पदाधिकाºयाने तर महापालिकेत ठेकेदारी करणाºया एका ठेकदार कार्यकर्त्याचे नाव पुढे केले आहे. आता अशाच प्रकारे अनेकांनी नव्याने विविध माध्यमांतून लॉबिंग सुरू केले आहे.