महावितरणच्या विशाल सोसायटीजवळील खांबावर जाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:38 IST2019-03-27T00:38:35+5:302019-03-27T00:38:55+5:30
जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आपली दुचाकी, चारचाकी वाहने तत्काळ खांबाच्या परिसरातून हटविल्याने अनर्थ टळला.

महावितरणच्या विशाल सोसायटीजवळील खांबावर जाळ
नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आपली दुचाकी, चारचाकी वाहने तत्काळ खांबाच्या परिसरातून हटविल्याने अनर्थ टळला. कारण शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या दूरवर उडत होत्या. यामुळे मोठी आग लागण्याचा धोका वाढला होता.
दरम्यान, जुनाट केबल जळाल्याने मोठा आवाज ऐकू आल्याचे या भागातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयाला मिळताच जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन या भागातील वीजपुरवठा रोहित्रावरून तत्काळ खंडित केला. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करून आग विझविणे शक्य झाले.
रोहित्रावरून वीजपुरवठा करणारी केबल जळाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुपारच्या सुमारास विशाल सोसायटी, श्रीमंत इच्छामणी सोसायटी, जुनी पंडित कॉलनी या भागातील वीजपुरवठा दोन ते तीन तास खंडित झाला होता.