स्वत:तील दोष नष्ट करण्याची गरज : वेणाभारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:18 IST2018-03-27T01:18:23+5:302018-03-27T01:18:23+5:30
समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले.

स्वत:तील दोष नष्ट करण्याची गरज : वेणाभारती
नाशिक : समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘श्री समर्थ हृदयातील राम’ या विषयावर वेणाभारती महाराज यांचे प्रवचन झाले यावेळी त्या बोलत होत्या. समर्थ हृदयातील राम समजायला साधना हवी, तप हवे, गुरूसेवा घडायला हवी व गुरूकडून ज्ञान घ्यायला हवे. दशमी तिथीची सायंकाळ साधनेसाठी खूप महत्त्वाची आहे, पण आजच्या काळात समाजमाध्यमात रमणारे मन राम नामात लागेल का, अशी शंका व्यक्त करीत स्वत:मधील रावण शोधून म्हणजेच दोष शोधून ते मारायला हवेत, असे विचार मांडले. समर्थांसारखे समर्थ व्हायचे तर रामसेवा हा एकच ध्यास हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, मंदिराचे विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी वेणाभारती महाराज यांचा सत्कार केला.
वाचा कोमल हवी
समर्थांनी अवघड काळात दारोदारी जाऊन राम नाम जागरण केले, धाडसाने रामकार्य केले, म्हणून गुरू शोधा व त्यांना आपल्या जन्माचे कारण विचारा, असे सांगून त्यांनी हृदयात राम येण्यासाठी मन पूर्ण रिकामे हवे, शुद्ध हवे, कोमल वाचा हवी, स्वत:जवळ शांत बसायला हवे, असेही वेणाभारती महाराज म्हणाल्या.