गुन्हेगार सुधार योजना भविष्यातील मोठी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:02 IST2021-06-25T18:58:05+5:302021-06-25T19:02:50+5:30
यावेळी पंचवटी, आडगाव म्हसरूळ पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वर असलेले ७० पेक्षा अधिक गुन्हेगार उपस्थित होते. सर्वांना सुधारण्याची संधी दिली जात असून, विविध ठिकाणी नोकरी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

गुन्हेगार सुधार योजना भविष्यातील मोठी चळवळ
पंचवटी : संपूर्ण नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार योजना माध्यमातून गुन्हेगारांना गुन्हेगारी पासून दूर करण्यासाठी प्रयत्न असून त्यात यश मिळाले तर निश्चितच आगामी काळात देशभरात मोठी चळवळ ठरू शकेल असे प्रतिपादन पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी केले. विविध गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस आयुक्त पांडेय यांच्या संकल्पनेतुन शुक्रवारी धनदाई लॉन्स येथे गुन्हेगार सुधार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचवटी, आडगाव म्हसरूळ पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वर असलेले ७० पेक्षा अधिक गुन्हेगार उपस्थित होते. सर्वांना सुधारण्याची संधी दिली जात असून, विविध ठिकाणी नोकरी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. धनदाई लॉन्स येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार मेळाव्यात पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, आडगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, म्हसरूळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पत्रकार चंदूलाल शहा, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे संदीप गायकवाड, उद्योजक धनंजय बेळे, संमोहन तज्ज्ञ शैलेंद्र गायकवाड, मनोविकार तज्ज्ञ मुक्तेश्वर दौंड उपस्थित होते.
यावेळी पांडेय यांनी पुढे सांगितले की आज समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जगणे सोपे नाही त्यासाठी प्रामाणिकपणा, आणि मेहनत आवश्यक आहे. गुन्हेगारी पाप माथ्यावर लागले की ते लवकर धुतले जात नाही. गुन्हेगार सुधार उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी स्थानिक स्तरावर पोलिसांच्या संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे पांडेय यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी तर सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक उमा गवळी यांनी केले. आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मानले.