नववर्ष स्वागत यात्रेतून होणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:08 IST2019-03-29T18:07:05+5:302019-03-29T18:08:22+5:30
उपक्रम: गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले ...

नववर्ष स्वागत यात्रेतून होणार जनजागृती
उपक्रम: गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असतांना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे.
अत्रेयनंदन बहुद्देशीय सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्ष प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे, सचिव राजेश मालपुरे यांनी दिली.
सिडको परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडवानिमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच सिडको परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेत सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था यांचा सहभाग असतो. शोभायात्रेत पारंपारिक ढोलपथक, झांजपथक, ध्वजपथक, लेझीम सहभागी होणार आहे.
शनिवार दि ६ एप्रिल रोजी सकाळी ०६:३० वा. सिडको परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारूती मंदिर ते माऊली लॉन्स या तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरु होऊन डी.जी.पी. नगर-२ माउली लॉन्स शेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वा. एकत्र येणार आहे. या शोभा यात्रेत परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.