नाशिककरांनो! हेल्मेट घरी ठेवाल, तर पैशाला मुकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:30 IST2019-11-14T00:29:37+5:302019-11-14T00:30:16+5:30
रस्ते अपघातात नाशिककरांचा जीव जाऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शहर पोलिसांनी गुरुवार (दि.१४)पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे जाहीर केले आहे.

नाशिककरांनो! हेल्मेट घरी ठेवाल, तर पैशाला मुकाल
नाशिक : रस्ते अपघातात नाशिककरांचा जीव जाऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शहर पोलिसांनी गुरुवार (दि.१४)पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे जाहीर केले आहे. यामुळे हेल्मेट घरी ठेवून दुचाकीने बाहेर पडणाºया नाशिककरांना हक्काच्या पैशांवर दंडाच्या स्वरूपात पाणी सोडावे लागू शकते.
हेल्मेट, सिटबेल्टचा वापर न केल्यामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढू लागले आहे. चालू वर्षी अकरा महिन्यांत १३९ नाशिककरांचा रस्त्यांवर अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये ७८ दुचाकीस्वारांपैकी ६७ दुचाकीचालकांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होऊन त्यांचा बळी गेला. तसेच १० चारचाकीचालकांनी सिटबेल्टचा वापर न केल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
रिक्षाचालकांवरही कारवाई
प्रवासी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहतूक करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांवरदेखील या मोहिमेत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, बॅच, बिल्ला, मूळ कागदपत्रे सोबत न बाळगणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सिग्नलकडे दुर्लक्ष करणे, फ्रंटसीट वाहतूक करणे आदीप्रकारे वाहतूक नियमांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणारे रिक्षाचालक पोलिसांच्या ‘रडार’वर राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.