nashik,gangapur,dam,is,55,percent |  गंगापूर धरण ५५ टक्के
 गंगापूर धरण ५५ टक्के

ठळक मुद्देक्षेत्रात जोर कमी; जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना गंगापूर धरण क्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने धरणाचा पाणीसाठा अवघा एका टक्क्याने वाढला आहे. शनिवारी ५४.२८ टक्के असलेला साठा रविवारी ५५.७० टक्के इतकाच झाला आहे. दारणा धरणात शुक्रवारी असलेला ७०.९७ टक्के साठा रविवारी ७२ टक्के इतका झाला आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नाशिक तालुक्यात रविवारी केवळ १५ मि.मी. पाऊस झाला. पावसाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यात सध्या विसंगत चित्र पहावयास मिळत आहे.
आठ ते दहा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांमधून पाणी वाहू लागले आहे, तर शेतकऱ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाºया जिल्ह्यात उशिराने पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना लागलेली चिंता परतलेल्या पावसाने काहीशी कमी झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी ५५ टक्के इतकी झाली आहे, तर दारणा धरण ७२ टक्के इतके भरले आहे. नांदूरमधमेश्वरमधून २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ करणाºया क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून अत्यल्प पाऊस असल्याने धरणातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ होऊ शकलेली नाही. गेल्या ७ आणि ८ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नाशिक शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा चिंता लागली होती. परंतु आता गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी लागत असताना त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात समाधानकारक पाऊस झालेला नाही.
रविवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५५, कश्यपीमध्ये ३५, गौतमीमध्ये ३८ तर आळंदी धरणात ३१ टक्के इतका पाणीसाठा आहे. दारणा धरणात ७२ टक्के, भावली ८२ टक्के, मुकणे २३ टक्के, वालदेवी ५७ टक्के, कडवा ५७ टक्के, नांदूरमधमेश्वर ९८ टक्के भरले आहे.


Web Title: nashik,gangapur,dam,is,55,percent
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.