Nashik Crime news: प्रेमसंबंधासाठी बहिणीशी संपर्क असल्याच्या करत संशयावरून तिघांनी एका तरुणाची हत्या केली. नसीम शहा (मयत) हा तरुण शिवाजीनगरच्या पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात होता, त्याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. २६ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सातपूर शिवाजीनगरच्या पाझर तलावाजवळ नसीम अकबर शहा (१९, रा. शिवाजीनगर) यास संशयित आरोपी विशाल तिवारी, आदित्य वाघमारे, वैभव भुसारे यांनी दुचाकीने येत अडविले. त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जमिनीवर पाडले.
एका नागरिकांना पोलिसांना दिली माहिती
तो गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच तिघांनी दुचाकीने पोबारा केला होता. ११२ क्रमांकावर एका जागरूक नागरिकाने युवक जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेला असल्याची माहिती कळविली.
वाचा >>वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
यानंतर गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने रुग्णवाहिकेतून नसीमला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
सीसीटीव्ही फुटेजवरून सुगावा
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांना निष्पन्न करून शोध घेण्यास सुरुवात केली. या तिघांना अवघ्या चार ते पाच तासात गंगापूर पथकांनी सिन्नरफाटा, चांदोरी, सायखेडा भागातून ताब्यात घेतले.
या तिघांची कसून चौकशी केली असता तिवारीच्या बहिणीला नसीम याने प्रपोज केल्याचा त्यास संशय होता. यामुळे त्याने त्याच्या मित्रांना सोबत घेत त्याला जाब विचारण्यासाठी अडवून मारहाण केली.
या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितले.