अश्वजीत जगताप-
Nashik Crime: नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील एका खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, पत्त्याचे कॅट, कंडोम आणि सायकलची चेन सापडल्याने शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांनाही मोठा धक्का बसला. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज देण्यात आली. परंतु, शालेय मुलांच्या दप्तरात अशा वस्तू सापडल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी या शाळेत चित्र विचित्र हेअरस्टाईल आणि हिरोगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस शाळेतच कापण्यात आले होते. त्यानंतर शिक्षकांनी अचानक इयत्ता आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले. दप्तरात फायटर, चाकू ,पत्त्याचे कॅट, कंडोम आणि सायकलची चेन सापडल्याने शिक्षकांना मोठा धक्का बसला.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून हा संपूर्ण प्रकार सांगितला. मुलांच्या दप्तरात अशा काही वस्तू सापडतील, अशी पालकांनी कल्पनाही केली नव्हती.शिक्षकांच्या जागरूकतेने हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढेही ही तपासणी अशीच चालू राहणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.