नाशिककरांना उन्हाचा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 01:25 IST2021-03-29T01:24:55+5:302021-03-29T01:25:50+5:30
शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.

नाशिककरांना उन्हाचा चटका
नाशिक : शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.
रविवारी दिवसभर प्रचंड कडक ऊन पडल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. शहरासह उपनगरांमधील रस्तेही ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. मागील आठवड्यात शहराचे कमाल तापमान पस्तिशीच्या जवळपास तर किमान तापमान १७ ते १९ अंशापर्यंत स्थिरावत होते. मागील दोन दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नाशिककरांना उन्हाचा जोरदार चटका सहन करावा लागत आहे. तत्पूर्वी शहरात अवकाळी पावसाचे ढग दाटून येत होते तसेच हलक्या सरीही पहाटे व संध्याकाळी कोसळत होत्या. शनिवारी शहरात ३८.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर रविवारी यामध्ये पुन्हा वाढ होऊन पारा ३९.१ अंशापर्यंत वर सरकला. दिवसभर प्रखर ऊन पडल्यामुळे नागिरकांना झळा असह्य झाल्या होत्या. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहरांमधील रस्ते सामसुम दिसून आले. यामुळे रविवारी कोरोना निर्बंधांचे पालन अधिकाधिक काटेकोरपणे होताना दिसून आले.
हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, आईस्क्रीम पार्लरमध्येही दिवसभर फारशी वर्दळ पाहावयास मिळाली नाही. कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने कोरोनाच्या निर्बंधांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली.
यंदा कडक उन्हाळा
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहे. मार्च महिन्याचे अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून बुधवारपर्यंत (दि. ३१) कमाल तापमानाचा पारा चाळिशीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. यापूर्वी २००४ साली १९ मार्च रोजी तसेच २०१९ साली २९ मार्च रोजी शहरात उच्चांकी ४०.४ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे.
आरोग्याबाबत राहावे लागणार सतर्क
उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने नाशिककरांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एकीकडे बदलते ऋतुमान अन् हवामानामुळे आरोग्यावर होणारा परिणाम तर दुसरीकडे पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच गडद झालेले कोरोनाचे संकट अशा दुहेरी धोक्याचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. शरीरातील पाण्याची मात्रा टिकून ठेवण्यावर नागरिकांनी भर देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.