नाशिक पोलीस : शिवजयंतीला बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:49 IST2018-02-15T20:45:03+5:302018-02-15T20:49:06+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे.

नाशिक पोलीस : शिवजयंतीला बळजबरीने वर्गणी गोळा कराल तर खबरदार
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि.१९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंतीउत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करु नये, अन्यथा संबंधितांविरुध्द खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा इंदिरानगर पोलिसांनी शिवजयंती व शांतता समितीच्या बैठकीत दिला.
शिवजयंतीसाठी अनेक मंडळांकडून वर्गणी गोळा करण्यात येत आहे. मात्र ही वर्गणी बळजबरीने मागितल्यास व तशी तक्र ार पोलिसांकडे आल्यास थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सूचना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी मंडळाच्या पदाधिकार्यांना केली.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. काही व्यक्ती जयंती, भंडारा, महाप्रसादाच्या नावाखाली व्यापा-यांकडून बळजबरीने व अट्टहास करुन अमुक रक्कमच द्या, असा दबाव निर्माण करतात, अशा परिस्थितीत ही वर्गणी नव्हे तर खंडणी वसुली ठरते. त्यामुळे कायद्याने असा प्रकार करणा-यांविरुध्द खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे न्याहाळदे म्हणाले. तसेच उत्सव हा शांततेत व नियमात साजरा झाला पाहिजे. न्यायालयाने डिजेचा वापरास बंदी घातलेली असल्याने डिजेचा वापर कोणाकडूनही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. डिजेचा वापर करणार्या मंडळाचे पदाधिकारी व डिजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यावेळी सण-उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे मार्गदर्शन त्यांनी केले. बैठकीला परिसरातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.