Nashik Oxygen Leak: Tears and Anger; Strong reaction across the country about the accident in Nashik | Nashik Oxygen Leak: अश्रूंचे लोट अन् संताप; प्राणवायूनेच घेतले २४ कोरोना रुग्णांचे प्राण

Nashik Oxygen Leak: अश्रूंचे लोट अन् संताप; प्राणवायूनेच घेतले २४ कोरोना रुग्णांचे प्राण

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन कोविड रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे प्राणवायू पुरवठा खंडित होऊन तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांत १२ पुरुष आणि १० महिलांचा समावेश असून, या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एकीकडे ऑक्सिजनअभावी नाशिकच नव्हेतर, राज्यभरात रुग्णालयांत बेड मिळत नसताना दुसरीकडे मात्र उपलब्ध ऑक्सिजनची गळती होऊन रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ आल्याने व्यवस्थेची हलगर्जी समोर आली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चाैकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 


नाशिक शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात एकूण १५७ बेडची क्षमता असून, हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरलेले आहे. १३१ रुग्ण ऑक्सिजन व १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील ६३ रुग्ण गंभीर होते. रुग्णालयात महिनाभरापूर्वीच ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली. ही टाकी ऑक्सिजनने भरताना नोझल तुटल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळती सुरू झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. 


तोपर्यंत रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तंत्रज्ञ 
आणि पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी रुग्णांचे नातेवाईकही कोविड कक्षात धावले. डॉक्टर्स, कर्मचारी आणि नातेवाइकांनी छातीवर दाब देऊन रुग्णांना पम्पिंग करून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक रुग्ण अगदी नातेवाइकांसमोर दगावले. 

धावपळीतही पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश
रुग्णालयातील या दुर्घटनेनंतर प्रत्येक जण आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी धावपळ करू लागला. महापालिकेने गंभीर रुग्ण तातडीने हलवण्याची तयारी केली. येथील पाच रुग्ण अन्यत्र स्थलांतरित केल्याने ते बचावले. चार रुग्णांना बिटको रुग्णालयात तर एकाला समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे या धावपळीतही पाच जणांचे प्राण वाचवण्यात यंत्रणेला यश आले. परंतु, व्यवस्थेने योग्य वेळी काळजी घेतली असती तर हकनाक बळी गेलेच नसते, अशा संतप्त भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

टाकीला गळती कशी लागली? 
n ऑक्सिजन टाकीची गळती कशी झाली, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर केला जात असून, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकीतून वेपोरायझरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन पाठविण्यासाठी असलेल्या पाइपलाइनला गळती लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सकृतदर्शनी आढळल्याचे सांगितले. 
n या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेने तातडीने 
शहरात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. त्यांनी तातडीने त्या ठिकाणी वेल्डिंग करून गळती थांबविली. पण, तोपर्यंत २४ रुग्णांनी प्राण गमावले होते.
दहा लाखांची आर्थिक मदत
मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे तर नाशिक महापालिकेनेही पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तळमजल्यावर काही जण धावले, पण...
या रुग्णालयाच्या तळमजल्यावर काही ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे कळल्यावर कर्मचारी व नातेवाईक ते घेऊन कक्षात धावले. दरम्यानच्या काळात दुर्घटनेची माहिती कळताच जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून तातडीने पंधरा जम्बो सिलिंडर या रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही ऑक्सिजनचा 
पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने या धावपळीत २४ रुग्णांचा मृत्यू झाला.
घटनेतील बळींची नावे अशी... 
पंढरीनाथ नेरकर (३७), भय्या सांडुभाई सय्यद (४५), अमरदीप नगराळे (७४), भारती निकम (४४), श्रावण पाटील (६७), मोहना खैरनार (६०), मंशी शहा (३६), सुनील झाल्टे (३३), सलमा शेख (५९), आशा शर्मा (४५), प्रमोद वाळूकर (४५), प्रवीण महाले (३४), सुगंधाबाई थोरात (६५), हरणाबाई त्रिभुवन (६५), रजनी काळे (६१), गीता वाघचौरे (५०), बापूसाहेब घोटेकर (६१), वत्सलाबाई सूर्यवंशी (७०), नारायण इरनक (७३), संदीप लोखंडे (३७), बुधा गोतरणे (६९), वैशाली राऊत (४६), इतर दाेघांची नावे कळू शकली नाहीत.

डॉक्टर्स, वॉर्डबॉय आणि परिचारिकांची एकच धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरेशा दाबाने मिळावा, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. 

जे १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यांची अवस्था सर्वाधिक 
बिकट होती. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या १३१ पैकी सुमारे निम्मे रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांनादेखील ऑक्सिजनची नितांत आवश्यकता होती. अचानक उद्‌भवलेल्या या पेचप्रसंगामुळे रुग्णालयातील सर्व रुग्णांकडून डॉक्टरांचा पुकारा होऊ लागला. 
अत्यवस्थ रुग्णाजवळ थांबून पम्पिंग करण्याशिवाय त्यांना काहीच करण्यासारखे उरले नव्हते. ज्या रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या परिसरातच थांबून होते, त्यांनी तातडीने आतमध्ये धाव घेत आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली.
कुणी डॉक्टरांच्या नावाने हाक मारतोय, कुणी एखाद्या वॉर्डबॉयचा हात धरून त्याला आपल्या पेशंटजवळ येण्याची विनंती करतो, कुणी सिस्टरसमोर रडतोय, ओरडतोय.. सर्वत्र अंदाधुंदी, गोंधळ माजल्याचे हृदयद्रावक चित्र हॉस्पिटलमध्ये दुपारी साडेबारापासून सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरू होते.

ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेने अतिव दुःख झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना गमावणाऱ्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त करतो आणि इतर सर्व रुग्णांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजनगळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी शोक व्यक्त करतो.
    नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नाशिकमधील अपघाताची बातमी ऐकून मी दु:खी झालो आहे. यात ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्या नुकसानीबद्दल संवेदना. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
    अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

नाशिकमध्ये निरपराध रुग्ण दगावल्याने तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना शोक संवेदना व्यक्त करतो. बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो.
    भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

ऑक्सिजनगळतीची दुर्घटना धक्कादायक, मन हेलावणारी आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. या दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न आहे.
    उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Web Title: Nashik Oxygen Leak: Tears and Anger; Strong reaction across the country about the accident in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.