शिवसेनेची सत्तेची दारे नाशिकने उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:44 AM2019-09-23T00:44:25+5:302019-09-23T00:45:52+5:30

‘दार उघड बये दार उघड’ अशी साद आई जगदंबेला नाशिकच्या भूमित घालताच अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत विजयश्री खेचून आणली व राज्याच्या विधीमंडळावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला.

 Nashik opens doors of power to Shiv Sena | शिवसेनेची सत्तेची दारे नाशिकने उघडली

शिवसेनेची सत्तेची दारे नाशिकने उघडली

Next

नाशिक : ‘दार उघड बये दार उघड’ अशी साद आई जगदंबेला नाशिकच्या भूमित घालताच अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत विजयश्री खेचून आणली व राज्याच्या विधीमंडळावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला. सन १९९५ साली झालेल्या निवडणुकीत जिल्ह्याने शिवसेनेच्या पदरात पाच आमदार दिले, तर भाजपानेदेखील त्या खालोखाल जागा मिळवून जिल्ह्यावर पहिल्यांदाच युतीने वर्चस्व प्रस्थापित केले. देवळालीतून बबन घोलप, येवल्यातून कल्याणराव पाटील, निफाडहून रावसाहेब कदम, नांदगावमधून राजेंद्र देशमुख अशा चार आमदारांनी जिल्ह्याचे राजकारण बदलून टाकले. शिवसेनेचा झंझावात ग्रामीण भागात घोंगावू लागला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेने वरचष्मा कायम ठेवला. आजही शिवसेनेची पाळेमुळे कायम आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे विशेष पे्रम असलेला जिल्हा म्हणून नाशिककडे राजकीय वर्तुळातून पाहिले जाते. त्याचमुळे शिवसेनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकची निवड केली. सलग दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाचा समारोप ठाकरे यांच्या जाहीर सभेने झाला. शिवसेनामय भारावलेल्या वातावरणाचा झंझावात राज्यातील कानाकोपºयात पोहोचला परिणामी त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसून आले. १९९५ मध्ये विधीमंडळावर युतीचा भगवा फडकला. त्यात नाशिक जिल्ह्याचे योगदान पाहता, मंत्रिमंडळात नाशिकच्या वाट्याला तीन मंत्रिपदे देण्यात आली. याच काळात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सेनेने-भाजपाला पिछाडीवर टाकून घवघवीत यश मिळविले व नाशिक जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेने कब्जा मिळवायला सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या १९९९ च्या निवडणुकीत राज्यातील सारी राजकीय समीकरणे बदलली. ९५च्या निवडणुकीत चार जागा मिळविणाºया शिवसेनेला ९९ मध्ये अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. राज्यातील सत्ता युतीच्या ताब्यातून गेली. मात्र देवळाली, येवला, निफाड या जागा सेनेने कायम राखल्या. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. सन १९९७ मध्ये शिवसेनेने नाशिक महापालिकेवर अपक्षांच्या मदतीने भगवा फडकविला. सन २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची काही प्रमाणात पडझड झाली. येवल्याची जागा छगन भुजबळ यांनी हिसकावून घेतली तशीच निफाडची जागाही राष्टवादीच्या ताब्यात आली. शिवसेनेला राजकीय झटका बसला मात्र देवळाली हा पारंपरिक बालेकिल्ला शाबूत राहिला.
सध्याच्या जागा टिकविण्याचे आव्हान
या निवडणुकीत मालेगाव बाह्य, नादंगाव, निफाड, दिंडोरी व देवळाली या पाचही मतदारसंघावर शिवसेनेने पकड बसविली. पंधरा जागांपैकी पाच जागा सेनेने ताब्यात घेतल्या. सन २०१४च्या निवडणुकीत सेनेचा जोर कायम राहिला मात्र एक जागा घटली. शिवसेनेने देवळाली, निफाड, सिन्नर व मालेगाव बाह्य या चार मतदारसंघांवर आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत आपली सत्ता पुन्हा खेचून आणली. आता सेनेला आपल्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. लोकसभेला सेनेचा खासदार निवडून आला असला तरी, मदतीला भाजपा होती. आता युतीचे अजून ठरायचे बाकी आहे.

Web Title:  Nashik opens doors of power to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.