आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

By Suyog.joshi | Updated: February 18, 2025 22:44 IST2025-02-18T22:43:19+5:302025-02-18T22:44:07+5:30

प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी पथक सोमवारी अभ्यास दौऱ्यावर गेले

Nashik officials inspect Prayagraj Mahakumbha in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela | आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सुयोग जोशी, नाशिक: आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा भाग म्हणून येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यास भेट देऊन पाहणी केली. पथकाने प्रयागराज येथील विविध घाट, मेळा क्षेत्र, आखाडे आदींना भेटी दिल्या. तेथील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, भाविकांना दिल्या जात असलेल्या सुविधा आदींची माहिती घेतली.

प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी (दि.१७) अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. पथकात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत येत्या २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली जात आहे. या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यास या पथकाने भेट देऊन पाहणी केली. प्रयागराज महाकुंभमेळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय किरण आनंद यांनी नाशिकच्या पथकासमोर सविस्तर सादरीकरण करून संवाद साधला. त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आणि पथकातील सदस्यांच्या शंकांचे समाधान केले.

पथकाने तेथे स्थापन करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) येथेही भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. पोलीस, नागरी प्रशासन, अग्निशमन व आपत्कालीन व्य्वस्थापन आदी यंत्रणांचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत. प्रयागराज शहरात विविध ठिकाणी लावलेल्या अडीचहजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सनियंत्रण येथून होत आहे. तसेच केंद्र सरकारच्या रेल्वे, दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, बीएसएफ यांसह विविध विभागांचे अधिकारी याठिकाणच्या कक्षासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचे स्वरुपही पथकाने समजावून घेतले.

डिजिटल महाकुंभ

नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० दूरध्वनी संच असलेल्या सुसज्ज टेलिफोन कॉल सेंटरच्या कामकाजाविषयी पथकाने जाणून घेतले. नागरिकांच्या अडचणी, नातेवाईक हरवले तर त्यांच्या मदतीसाठीचा हा संपर्क कक्ष आहे. पथकाने 'डिजीटल महाकुंभ'ला भेट देवून भाविकांना देण्यात येणाऱ्या माहितीविषयी जाणून घेतले. याबरोबरच या पथकात समाविष्ट विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांशी निगडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून प्रयागराज येथे करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली.

Web Title: Nashik officials inspect Prayagraj Mahakumbha in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.