नाशिक : महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, रिंगणात असलेल्या ७२९ उमेदवारांमुळे शहरात राजकीय धुरळा उडाला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत उमेदवारी डावलली असताना दुसरीकडे मात्र तीन माजी महापौर स्वतः तर तीन माजी महापौरांचे कुटुंबिय रिंगणात उभे ठाकले आहेत.
माजी महापौरांमध्ये रंजना भानसी व नयना घोलप या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहे. तर मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना शिंदेसेनेने पुरस्कृत केले आहे. मुर्तडकही रिंगणात आहेत.
माजी महापौर व उद्धवसेनेतून भाजपत प्रवेश केलेल्या विनायक पांडे यांची सून अदिती पांडे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. तसेच मनसेच्या काळात महापौरपद भूषविलेले यतिन वाघ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी हितेश वाघ या भाजपकडून निवडणुकीत उभ्या आहेत.
माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची मुलगी संध्या कुलकर्णी यासुद्धा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे तीन माजी महापौरांनी आपल्या कुटुंबीयांनाच आखाड्यात उभे केले आहे. तेथील लढती चुरशीच्या होणार आहे. त्यात कोण बाजी मारणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. सत्तेसाठीची ही लढाई केवळ संख्येपुरती मर्यादित न राहता, अनुभव विरुद्ध नवखे चेहरे, पक्षनिष्ठा विरुद्ध बंडखोरी आणि जुनी सत्ता विरुद्ध नव्या समीकरणांचा संघर्ष चनली आहे.
दोन माजी उपमहापौर, सहा माजी स्थायी सभापती आखाड्यात
दोन माजी उपमहापौर आणि सहा माजी स्थायी समिती सभापती पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत, स्थायी समितीचे सभापती राहिलेले सुरेश पाटील, संजय चव्हाण, हिमगौरी आडके, रमेश धोंगडे, शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे रिंगणात उभे ठाकले आहे.
सत्तेचा अनुभव, प्रशासनातील पकड आणि कार्यकाळातील कामांचा हिशेब घेऊन हे दिग्गज मतदारांच्या दारात उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नसून, थेट नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची चाचणी ठरणार आहे. महापालिकेच्या सत्तेत महत्त्वाची पदे भूषवलेले सभागृह नेते दिनकर पाटील, चंद्रकांत खोडे तसेच विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, डॉ. हेमलता पाटील, अजय बोरस्ते हे तिघेही नशीब अजमावत आहेत. अटीतटीच्या सामन्यांमध्ये कोण विजयी होणार हे येणारा काळच ठरविणार आहे.
Web Summary : Nashik's election sees ignored workers as three ex-mayors and their families compete. Key leaders also test their fate. Experience, loyalty, and new alliances clash in this critical battle for municipal power.
Web Summary : नाशिक चुनाव में कार्यकर्ताओं की उपेक्षा, तीन पूर्व महापौर और उनके परिवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। प्रमुख नेता भी अपनी किस्मत आजमा रहे हैं। अनुभव, निष्ठा और नए गठबंधन नगरपालिका सत्ता के लिए इस महत्वपूर्ण लड़ाई में टकराते हैं।