नाशिक महापालिका करणार ९६ कंत्राटी डाॅक्टरांची भरती

By Suyog.joshi | Published: October 17, 2023 12:59 PM2023-10-17T12:59:04+5:302023-10-17T12:59:29+5:30

महापालिकेकडून तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याने डाॅक्टर मनपाच्या रुग्णालयात सेवा देण्यास नकार देतात.

Nashik Municipal Corporation will recruit 96 contract doctors | नाशिक महापालिका करणार ९६ कंत्राटी डाॅक्टरांची भरती

नाशिक महापालिका करणार ९६ कंत्राटी डाॅक्टरांची भरती

नाशिक: महापालिका आरोग्य विभागातर्फे सहाही विभागांतील रुग्णालयात एकूण विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार असून, लवकरच त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. परंतु, या अगोदर अनेकदा जाहिरात प्रसिद्ध करूनही डाॅक्टर या भरतीकडे पाठ फिरवतात, असा अनुभव आहे. महापालिकेकडून तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याने डाॅक्टर मनपाच्या रुग्णालयात सेवा देण्यास नकार देतात.

शहरात महानगरपालिकेचे पाच मोठी रुग्णालये असून, त्यात बिटको, डॉ. झाकिर हुसेन, इंदिरा गांधी रुग्णालय, श्रीस्वामी समर्थ रुग्णालय व तपाेवन यांचा समावेश आहे. या ठिकाणी उपचारासाठी नेहमी गर्दी असते. आरोग्य विभागात एकूण ९३३ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल ४६३ पदे रिक्त आहेत. अवघ्या ४७० मनुष्यबळावर रुग्णालयाचे काम सुरू असून अतिरिक्त ताणामुळे सेवेवर परिणाम होत आहे. महापालिकेकडून तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय अशी ७०६ पदांची भरती केली जाणार होती. पण ‘अ’ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता आरोग्याची इतर पदे भरली जाणार आहेत.

पण, त्यासदेखील नवीन वर्ष उजाडण्याची चिन्हे आहेत. पण, सध्या अपुऱ्या मनुष्यबळावरच गाडा हाकताना मनपा आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. त्यांनी सहा महिन्यांसाठी विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला असून हा प्रस्ताव तातडीने आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यांच्या वेतनावर सहा महिन्यांसाठी अडीच कोटी खर्च येणार असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

शल्यचिकित्सक- २, वैद्यकीयशास्त्र तज्ज्ञ- ४, स्त्रीरोगतज्ज्ञ- ५, क्ष-किरणतज्ज्ञ - २, बधिरीकरणतज्ज्ञ- २, नाक-कान-घसातज्ज्ञ- २, मानसोपचारतज्ज्ञ- १, दंत शल्यचिकित्सक- ३, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)- १०, वैद्यकीय अधिकारी- २० (बीएएमएस), जीएनएम- १०, एएनएम- १०.

Web Title: Nashik Municipal Corporation will recruit 96 contract doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.