Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना
By Suyog.joshi | Updated: February 27, 2024 16:41 IST2024-02-27T16:39:01+5:302024-02-27T16:41:51+5:30
Nashik: महापालिका तब्बल आठ वर्षांनंतर वृक्ष गणना करणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे.

Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना
- सुयोग जोशी
नाशिक - महापालिका तब्बल आठ वर्षांनंतर वृक्ष गणना करणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे. त्यात वृक्ष गणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यापुर्वी मनपाचे २०१६ साली एका मुंबईच्या ठेकेदाराला नाशिक शहरातील वृक्ष गणनेचे काम दिले होते. शहरात सुमारे २५ लाख झाडे असतील, असा अंदाज गृहीत धरून या वृक्ष गणनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी ८.५० पैसे प्रती वृक्ष याप्रमाणे दोन कोटी १३ लाख ७५ हजार रुपये अदा केले जाणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे निविदा अंतिम झाल्यानंतर वृक्ष गणना सुरू झाली. मात्र, वृक्ष गणनेअंती शहरात ४९ लाख वृक्ष असल्याची आकडेवारी ठेकेदाराकडून सादर करण्यात आली. वास्तविक पाहता प्रशासकीय मंजुरीपेक्षा अधिक खर्चाच्या वृक्ष गणनेसाठी महासभेची फेर मंजुरी घेतली जाणे आवश्यक असताना त्यास फाटा देत ही वृक्ष गणना पूर्ण केली गेली.
वृक्ष प्राधिकरणाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन वृक्ष गणनेसाठी तीन कोटींची तर वृक्ष संवर्धनाच्या जुन्या कामांकरिता २.४० कोटी, नवीन वृक्ष संरक्षक जाळ्यांसाठी ६० लाख, जुने वृक्ष संरक्षक दुरुस्तीसाठी २० लाख, खत, माती खरेदीसाठी पाच लाख, नर्सरी बाबींकरिता पाच लाख, नर्सरी सुधारण्याकरिता ५१ लाख, रोपे खरेदीसाठी पाच लाख, कुंड्या खरेदीसाठी १० लाख, वृक्ष प्राधिकरण वाहन खरेदीसाठी ९० लाख, पुष्पोत्सवासाठी ४५ लाख, तसेच वृक्ष पुनर्रोपणासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.