नाशिक महापालिकेने थकबाकीदारांकडे वळविला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:32 IST2018-02-27T14:32:36+5:302018-02-27T14:32:36+5:30
१६४ कोटी रुपये घरपट्टी थकीत : मिळकती काढणार थेट लिलावात
नाशिक महापालिकेने थकबाकीदारांकडे वळविला मोर्चा
नाशिक - वर्षानुवर्षापासून घरपट्टी थकविणा-या मिळकतधारकांच्या घरी आता मागायला जायचे नाही, तर कायदेशीर मार्गाने मिळकती जप्त करुन त्या थेट लिलावात काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी करवसुली विभागाला दिले आहेत. त्यानुसार, १६४ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्यासाठी ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली असून अंतिम नोटीसा बजावल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे ११० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत महापालिकेने ७८ कोटी रुपयांची घरपट्टी वसुल केलेली आहे तर येत्या महिनाभरात आणखी २५ ते ३० कोटी रुपये वसुली अपेक्षित आहे. १६४ कोटी रुपयांची घरपट्टी थकित असून वर्षानुवर्षापासून थकबाकी न भरणा-या मिळकतधारकांना महापालिकेकडून दरवर्षी नोटीसा बजावल्या जातात परंतु, मोजक्या मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊन पुढे प्रक्रिया थांबवली जाते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनावश्यक कामांना कात्री लावून स्पीलओव्हर कमी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत सर्वात जास्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी वसुलीकडे बघितले जाते. परंतु, वर्षानुवर्षापासून थकबाकी न भरणा-यांची संख्या प्रचंड असल्याने प्रशासनाने आता त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यानुसार, महापालिकेने ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविली असून त्यांना अंतिम नोटीसा पाठवल्यानंतर मिळकती जप्त करुन त्यांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासून घरपट्टी विभागाकडून कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात असून ज्याठिकाणी न्यायालयाची स्थगिती नाही, अशा थकबाकीदारांवर तातडीने कारवाईची पाऊले उचलली जाणार आहेत. १६४ कोटी रुपयांच्या थकबाकीमध्ये सुमारे ८० कोटी रुपयांची रक्कम ही २ टक्के शास्ती आणि वॉरंट फी आहे.