नाशिक : शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या बैठकीत महिला मतदारांचा टक्का वाढण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. यासाठी महिला पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. लाडक्या बहिणींना कॅच करण्यासाठी व्यूहरचना आखताना कोणत्या प्रभागात महिलांचे मतदान मागच्या निवडणुकीत कमी झाले, या निवडणुकीअगोदर मतदारांसमोरील असलेली आव्हाने, त्यांना निवडणूक आखाड्यात देण्यात येत असलेले आश्वासन या अशा अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदेसेनेचे लक्ष 'जेन झी' प्रमाणेच महिला मतदारांकडे असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मायको सर्कल येथील पक्ष कार्यालयात संपर्कप्रमुख संगीता खोडाना यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सोमवारी (दि.५) दुपारी घेण्यात आली. पूर्व विभाग प्रमुख मंगला भास्कर, मध्य व पूर्व विभागाच्या जिल्हाप्रमुख संगीता पाटील, पश्चिम विभागाच्या प्रमुख अस्मिता पाटील, अॅड. शिल्पा पाटील, मनोरमा पाटील, ज्योती देवरे आदी उपस्थित होते.
महिला नेत्यांच्या होणार सभा
बैठकीत एकदिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महिलांपर्यंत आपणास जाता येईल. त्यामुळे त्यांच्या समस्या कळतील, येणाऱ्या काळात पक्ष सत्तेत आल्यावर या समस्या सोडविल्या जातील, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रचारात पक्षातील महिला नेत्यांच्या सभा होणार असून, त्यादृष्टीनेदेखील नियोजन करण्यात आले आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रचाराची रणनीती आखण्यात आली. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवर्तीना भेटून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा बैठकीत निर्णय करण्यात आला.
संगीता खोडाना महिला मतदारांना मतदानाचे महत्व पटवून द्यावे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवती आपल्या भागात कोणत्या शोध घेऊन त्यांना मतदानाचे महत्व सांगावे. संगीता पाटील यांनी निकालात महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे सांगून महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचे सूचित केले. मुंबई, नाशिक, ठाणे व अन्य महापालिकांवर भगवा फडकविण्यासाठी प्रामुख्याने महिला, युवती आणि युवकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.