मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा 

By संजय पाठक | Updated: October 30, 2023 17:57 IST2023-10-30T17:56:53+5:302023-10-30T17:57:26+5:30

मराठा समाज बांधव झाले संतप्त झाल्याने निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र

Nashik MP Hemant Godse resigns for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा 

मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा 

नाशिक- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गेाडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि
कार्यक्रम रद्द होत आहेत.

दरम्यान, आज आंदोलनाच्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे भेटण्यासाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. समाजासाठी तुम्ही
खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षणे देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे.

Web Title: Nashik MP Hemant Godse resigns for Maratha reservation