भयंकर! महिला सावकाराची दाम्पत्याला अमानुष मारहाण; महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 20:08 IST2021-03-22T20:07:45+5:302021-03-22T20:08:00+5:30
व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून दखल; महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल

भयंकर! महिला सावकाराची दाम्पत्याला अमानुष मारहाण; महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
नाशिक: व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने आदिवासी दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नांदगावातल्या पिंप्राळे इथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैशांसाठी महिला सावकारानं दुसऱ्या महिलेला विवस्त्र करण्याचादेखील प्रयत्न केलाय. या घटनेबद्दल सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नांदगावमधील प्रिंप्राळे इथे एका गरीब आदिवासी दाम्पत्यानं संगीता वाघ नावाच्या महिला सावकाराकडून १५ हजार रुपये व्याजानं घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती. पण परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मुद्दल अजून शिल्लक असल्याचा दावा महिला सावकारानं केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेल्या महिला आणि एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली.
दाम्पत्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या प्रकाराची माहिती पोलिसांना समजली. हा प्रकार समजताच नांदगाव पोलिसांनी महिला सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक करत आहेत.