नाशिककर गारठले ! पारा थेट ६.९ अंशांपर्यंत घसरला; हंगामातील नीचांकी नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:17 IST2025-12-20T18:17:27+5:302025-12-20T18:17:57+5:30
शनिवारी (दि. २०) या हंगामातील नीचांकी ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. वाढलेल्या कडाक्यामुळे नाशिककर गारठले आहे...

नाशिककर गारठले ! पारा थेट ६.९ अंशांपर्यंत घसरला; हंगामातील नीचांकी नोंद
नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट नागरिकांना तीन दिवसांपासून अनुभवयास येत आहे. पारा वेगाने घसरत असून, मागील ४८ तासांत तीन अंशांनी किमान तापमानात घट झाली. शनिवारी (दि. २०) या हंगामातील नीचांकी ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. वाढलेल्या कडाक्यामुळे नाशिककर गारठले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीची लाट शहरास जिल्ह्यात अनुभवयास येत आहे. वेगाने घसरणाऱ्या किमान तापमानामुळे गोदाकाठावर हुडहुडी जाणवत आहे. यंदाचा हिवाळा अधिक प्रभावीपणे जाणवत आहे. राज्यात सर्वाधिक थंडी उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या जाणवत आहे. या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे सातत्याने घसरत आहे. यावर्षीच्या हिवाळ्यात ऑक्टोबरमध्ये थंडी नव्हती. दुसऱ्या टप्प्यात थंडी सलगपणे अनुभवयास येत आहे. थंडीचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या निम्म्यावर नाशिकसह राज्यभरात कडाका वाढला आहे. हा टप्पा २६ जानेवारीला संपणार आहे. तेथून पुढे १५ फेब्रुवारीपर्यंत थंडीचा तिसरा टप्पा सुरू होईल, असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे म्हणाले.
निफाडमध्ये ४.५ अंशांपर्यंत घसरण -
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका हा प्रचंड कडाक्याच्या थंडीसाठी ओळखला जातो. यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच हा तालुका सातत्याने गारठत आहे. निफाडकरांना शेकोटीचा आधार सकाळ आणि संध्याकाळ घ्यावा लागत आहे. शुक्रवारपाठोपाठ शनिवारीही या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ४.५अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा निफाडमध्ये घसरला. राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका हा तालुका सध्या मागील काही दिवसांपासून अनुभवत आहे.