Nashik Fire: नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू
By पुरुषोत्तम राठोड | Updated: January 1, 2023 13:55 IST2023-01-01T13:54:29+5:302023-01-01T13:55:25+5:30
अनेक कामगारांच्या जिवीतहानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टरांचे पथक आणि अॅम्बुलन्स पोहोचल्या आहेत.

Nashik Fire: नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू
इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली असून आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
अनेक कामगारांच्या जिवीतहानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टरांचे पथक आणि अॅम्बुलन्स पोहोचल्या आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला ही आग लागली आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.
आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार आहेत. साडे अकराच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
इगतपुरी ( नाशिक) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे कृषी महोत्सव कार्यक्रमासाठी सिल्लोड येथे जात असताना जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची घटना त्यांना समजली. त्यामुळे तातडीने कन्नड येथून मुंडेगावाकडे येण्यासाठी पालकमंत्री रवाना झालेले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जात असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांच्या पथकाने उपचाराची तयारी केली असून जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.