नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:35 IST2018-02-28T15:35:17+5:302018-02-28T15:35:17+5:30
महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींना हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतीमान कारभाराचा आग्रह धरला व

नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांची बदली
नाशिक : अवघ्या नऊ महिन्यांपुर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रूजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असतांना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहिम उघडली होती, ते पाहता त्यांची अचानक बदलीमागे उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे.
महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींना हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतीमान कारभाराचा आग्रह धरला व त्यातून महसुल तसेच विकास यंत्रणेच्या अधिका-यांच्या बैठका घेवून त्यांना दप्तर दिरंगाई व बेकायदेशीर कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. काही नाठाळ अधिका-यांवर त्यांनी कारवाईची शिफारसही केल्याने झगडे यांच्या कामकाजावर अकार्यक्षम अधिकारी नाराज होते. मनमानी कारभार करणारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या बदलीची झगडे यांनीच शिफारस केली होती. जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक, राजकीय हस्तक्षेपास नकार देण्याचे काम झगडे यांनी केल्यामुळेच त्यांची बदली केली गेल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान घोटाळा, भुदान जमीन घोटाळ्यात झगडे यांनी कठोर पावले उचलल्यामुळे देखील झगडे यांची बदली झाल्याची चर्चा होत आहे. झगडे यांनी केलेल्या कारवाईचा तडाखा बसलेल्या काही अधिका-यांनी त्यांची बदली करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.