पारा ११.६अंश : ऐन मार्चमध्येही नाशिक ‘कुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:20 IST2020-03-14T14:16:31+5:302020-03-14T14:20:52+5:30
मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला.

पारा ११.६अंश : ऐन मार्चमध्येही नाशिक ‘कुल’
नाशिक : मार्च महिन्यात शहराचे किमान तापमान कमी होऊन कमाल तापमानात वाढ होते, असा अनुभव आतापर्यंत नाशिककरांचा राहिलेला आहे. थंडीची तीव्रता कमी होऊन ऊन तापण्यास सुरूवात झालेली असते; मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे मार्चमध्येही नाशिक ‘कुल सिटी’ असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. शनिवारी (दि.१४) तापमानाचा पारा थेट ११.६अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली.
मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. यामुळे मार्च महिना उजाडल्यानंतर थंडीपासून दिलासा मिळेल, अशी आशा नागरिक बाळगून होते; मात्र मागील आठवड्यापासून शहराचे कमाल तापमान व किमान तापमानात घट होण्यास सुरूवात झाली. मागील शनिवारी (दि.७) कमाल तापमान २९.४ तर किमान तापमान १४.८ इतके नोंदविले गेले होते. चार दिवसांपुर्वी तापमान ३१ अंश इतके नोंदविले गेले. सोमवारी (दि.९) कमाल तापमान सर्वाधिक ३२.३ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र त्यानंतर सातत्याने पारा घसरण्यास सुरूवात झाली. कमाल तापमानाचा पारा थेट २७ अंशापर्यंत तर किमान तापमानाचा पाराही हळुहळु ११.६ अंशापर्यंत खाली घसरला. एकूणच किमान तापमान १६ अंशावरून खाली ११ अंशापर्यंत तर कमाल तापमान ३२ अंशावरून २७अंशापर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना गुरूवारपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी पहाटे नागरिकांना हुडहुडी भरली होती. अचानकपणे शहरात थंडी वाढल्यामुळे नागरिकदेखील अवाक् झाले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला किमान तापमान १७ अंश तर कमाल तापमान २८.४ अंश इतके नोंदविले गेले.