मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांची पहिल्याच सभेत छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:09 IST2018-02-22T22:04:46+5:302018-02-22T22:09:13+5:30
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत गिते यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांची पहिल्याच सभेत छाप
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत गिते यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कामनिहाय खर्चाचे नियोजन करण्यापेक्षा हेडनिहाय खर्चाचा प्रस्ताव तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देत प्रलंबित कामांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांत महत्त्वाची बाब टेंडर प्रक्रियेतील विलंबावर आपला सर्वाधिक फोकस असल्याचे सांगून याबाबतची माहिती अधिकाऱ्याकडून घेतली असून, टेंडर प्रक्रिया सुरू होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. ३० टक्के निधी खर्चाबाबतचे सुरू असलेल्या नियोजनाबाबत सन्मानिय सदस्यांनी तत्काळ माहिती देण्याचे आदेशही गिते यांनी देत सदस्यांच्या मागणीचा सन्मानही केला.
कुपोषणाच्या कामावर जिल्हा परिषदेच्या कामात प्रचंड दिरंगाई असल्याचे मान्य करीत त्यांनी कुपोषणाच्या कामाकडे पुढील काळात बारकाईने लक्ष देणार असल्याचे सूचित केले. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेच्या संदर्भात पशुसंवर्धन विभागातून तत्काळ इतिवृत्त मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आताच्या आता व्हॉट््सअॅपवर इतिवृत्त मागवून घ्या आपण स्वत: सचिवांशी बोललो असल्याचे सांगून त्यांनी इमारतीच्या इतिवृत्ताचा प्रश्नही मार्गी लावला.
महावितरणकडून उपस्थित राहणाऱ्यां अभियंत्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. पुढील सर्वसाधारण सभेत जिल्ह्याशी संबंधित अभियंते बैठकीला उपस्थित असतील, असे आदेश देतानाच सदस्यांनी विजेसंदर्भातील सर्व प्रश्न माझ्याकडे आणून द्यावीत ते प्रश्न महावितरणकडे पाठवून पुढील सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णायक भूमिका त्यांनी मांडावी अन्यथा या प्रश्नांवर मंत्र्यांची बैठकदेखील सभागृहात बोलविली जाईल, असे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावले.