Nashik: All the candidates are shocked by the drop in percentage | नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

ठळक मुद्देमतदान यंत्रात दडले काय? : आकडेमोडीतून गणितांची मांडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकीचे दाखले दिले जात असले तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्णात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली.
व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने मतदानाचा टक्का वाढेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सोमवारी सायंकाळी संपलेल्या मतदानानंतर जिल्ह्णात ६२.१ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातील ६४.३४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यावेळी राज्यात मोदी लाटेचा प्रभाव असल्याचे सांगण्यात आले होते. यंदा मात्र मतदान घटल्याने त्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्याचबरोबर एकूण मतदानाची आकडेवारी व त्यात प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार करून घटलेल्या मतदानावरून ठोकताळे मांडण्यात येत आहे. या निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळाली असतील, याचा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने घटलेल्या मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, यादृष्टीने विजयाची मांडणी केली असून, त्यांच्या समर्थकांकरवी तर छातीठोक दावे केले जात आहे. असे असले तरी, या साऱ्या बाबी जर-तरच्या असून, मतदान यंत्रात काय दडले असेल याची धाकधूक सर्वांनाच लागून आहे. रविवार व सोमवार अशी लागोपाठ दोन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे मतदारांनी पर्यटनाला पसंती दिल्याचे सांगण्यात आले तर पावसाळी वातावरणामुळेदेखील मतदारांनी घराबाहेर पडण्यास धजावले नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घटल्याचा अर्थ काढला जात आहे. सोमवारी मतदान आटोपल्यानंतर प्रत्येक बूथनिहाय नेमलेल्या प्रतिनिधींकडून आलेली मतदानाची आकडेवारी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गोळा केली असून, त्याआधारे कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले नाही याचाही आढावा घेण्यात आला.

Web Title: Nashik: All the candidates are shocked by the drop in percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.