प्रशासनाच्या लेखी नरेंद्र दराडे अद्याप आमदारच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:09 IST2025-04-09T20:08:49+5:302025-04-09T20:09:18+5:30
पालकमंत्रिपदानंतर पुन्हा एक कारनामा : जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी कृषिमंत्र्यांचा पुढाकार

प्रशासनाच्या लेखी नरेंद्र दराडे अद्याप आमदारच!
नाशिक : विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल वर्ष होत आले असताना येवल्याचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे प्रशासनाच्या लेखी अद्यापही आमदार असून, शुक्रवारी (दि.११) जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणाऱ्या बैठकीसाठी त्यांना आमदार म्हणून निमंत्रितही करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेच्या कर्जवसुली आणि अडकलेल्या ठेवींबाबत कोरोनापासून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. बदललेल्या नोटांप्रकरणी जिल्हा बँकेने आजी-माजी लोकप्रतिनिधींना वसुलीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय शेतकरी आणि विविध कार्यकारी सोसायट्यांनी वसुलीविरोधात आक्रमक होत कर्ज वसुलीला विराेध केला आहे. या सर्व गोंधळाच्या वातावरणात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सक्षमीकरण करण्यासाठी उद्या, शुक्रवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सर्व लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या या पत्रात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार भास्कर भगरे, डॉ. शोभाताई बच्छाव, राजाभाऊ वाजे आणि सर्व आमदारांनाही उपस्थित राहण्यासाठी कळवण्यात आले आहे. मात्र, हे पत्र पाठवताना विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा कार्यकाळ २१ जून २०२४ रोजीच संपल्यानंतरही त्यांना या बैठकीचे निमंत्रण आमदार म्हणूनच देण्यात आले आहे. त्यामुळे दराडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना याचे निमंत्रण कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही एका शासकीय दौऱ्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे काही तासांपुरता जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्याचे काम प्रशासनाकडून झाले होते. त्यामुळे बैठकीचे हे पत्र म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती आहे.
अनेक नेतेच थकबाकीदार...
विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या उत्थानासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत असेही नेते आहेत ज्यांच्याकडेच जिल्हा बँकेच्या कर्जाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे या बैठकीतून काय निष्पन्न होते याकडेही लक्ष लागले आहे.