आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत एकोणीस बालकांचा शोध
By Admin | Updated: August 1, 2015 00:57 IST2015-08-01T00:55:46+5:302015-08-01T00:57:01+5:30
आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत एकोणीस बालकांचा शोध

आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत एकोणीस बालकांचा शोध
नाशिक : हरविलेले व बालकामगार म्हणून राबणाऱ्या शहरातील १९ मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस आणि चाइल्ड लाइन यांनी महिनाभरात केले आहे़ केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हे आॅपरेशन ‘मुस्कान’ राबविण्यात आले़
शहर पोलीस व चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेअंतर्गत शहरातील बेपत्ता व बालकामगारांचा शोध घेऊन १९ चिमुकल्यांना त्यांच्या पालकांपर्यंत तसेच बाल संरक्षण गृहात दाखल केले आहे. २०१० ते २०१५ या पाच वर्षांत हरवलेल्या मुलांचा आॅपरेशन ‘मुस्कान’ द्वारे शोध घेण्यात आला. या मोहिमेसाठी पोलीस आयुक्तालयात दोन पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस कर्मचारी आणि चाइल्ड लाइनच्या चार सदस्यांचा सहभाग होता़
या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी साध्या वेषात शहरात फिरून चिमुकल्यांचा शोध घेतला़ त्यात प्रामुख्याने शहरातील सिग्नल व बसथांब्यांवर भीक मागणारी बालके, हॉटेल, पानटपरी इतर ठिकाणी काम करणारी अल्पवयीन मुले यांचा शोध घेऊन चौकशी करण्यात आली़ या पथकातील पोलिसांनी हरवलेली चार मुले व एका मुलीचा शोध घेऊन पालक न मिळाल्याने त्यांची रवानगी बाल संरक्षण गृहात करण्यात आली़ तर बालमजूर म्हणून काम करणाऱ्या १२ मुलांसह २ मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले़ (प्रतिनिधी)