नांदूरशिंगोटेत आगीत संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:04 IST2020-12-20T22:05:06+5:302020-12-21T00:04:19+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. परिसरातील नागरिकांनी समयसूचकता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुमजली इमारतीला लागलेली आग.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. परिसरातील नागरिकांनी समयसूचकता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत तुळशीराम शेळके यांची दुमजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर दोन खोल्या भाडेकरुंना दिलेल्या आहेत. गावातीलच सुरेश बर्डे हे पत्नीसह येथे राहत असून मोलमजुरी करुन आपला उदरर्निवाह करतात. नेहमप्रमाणे दररोज सकाळी घरातील आपले काम आटोपून दोघेही मोलमजुरीसाठी गेले होते. सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून अचानक धुराचे लोट बाहेर येत असल्याचे घरमालक व आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले. गावातील मध्यवर्ती भागातील घराला आग लागल्याचे समाजात गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. गल्लीतील व परिसरातील तरुणांनी आसपासच्या ठिकाणाहून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. याचदरम्यान सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबही आला होता. अचानक घराला आग लागल्याने रोख पंधरा हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, रामदास सानप, प्रकाश सानप, नागेश शेळके, संदीप शेळके, सुरेश कुचेकर, गुलाब मोमीन, नितीन गवारे, आसीफ तांबोळी, भारत दराडे, रवींद्र शेळके यांनी मदत कार्य केले. कामगार तलाठी यांना या आगीची माहिती देण्यात आली.
चौकट...
आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणारे नितीन गवारे, आसिफ तांबोळी, वाहिद मणियार, गणेश तुपसुदंर, सुरेश बर्डे, गणेश शिंदे आदीसह परिसरातील युवक व महिलांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गवारे व तांबोळी यांनी आपला जीव धोक्यात घालून पहिल्या मजल्यावरील घराचा दरवाजा तोडला. हळूहळू आगीचे लोण खिडकीतून बाहेर येवू लागल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. विद्युत पंपाच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करीत आग नियंत्रणात आणली. दरम्यान घरात कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली.