‘तिथे’ नंदीविना महादेव तर ‘इथे’ महादेवाविना नुसताच नंदी
By Admin | Updated: December 8, 2015 00:16 IST2015-12-08T00:15:27+5:302015-12-08T00:16:47+5:30
‘तिथे’ नंदीविना महादेव तर ‘इथे’ महादेवाविना नुसताच नंदी

‘तिथे’ नंदीविना महादेव तर ‘इथे’ महादेवाविना नुसताच नंदी
असं म्हणतात की, महादेवाच्या दर्शनाला गेलं आणि तो व्यस्त असला तर नुसत्या नंदीचं दर्शन जरी झालं तरी महादेवापर्यंत तुमचा नमस्कार पोचता होतो. अडचण येत नाही.
पण कपालेश्वराची बातच न्यारी. तिथे नंदीच नाही. का नाही, याच्या अनेक आख्यायिका. पण त्या घोळात पडायलाच नको.
त्यातल्या एका आख्यायिकेप्रमाणे नंदीने आपली शिंगे खुपसून म्हणे एक ब्रह्महत्त्या केलेली असते. हत्त्या होताक्षणी त्याची शुभ्र कांती कृष्णवर्णी होते. मग त्याला रामकुंडातील स्नानाचा उपाय समजतो. हा उपाय करताक्षणी त्याची कांती पूर्ववत होते.
कालांतराने महादेवाच्या हातूनदेखील ब्रह्महत्त्या होते. तीदेखील थेट ब्रह्मदेवाची. नंदीजवळ उपाय असतोच. तो उपाय महादेवाला सांगितला जातो. महादेवही मग हा उपाय करण्यासाठी रामकुंडात स्नान करतो. ब्रह्महत्त्येच्या पापापासून मुक्ती! पण हा उपाय करण्यापूर्वी बहुधा नंदी महादेवाला सांगतो, तुमचं तुम्ही निपटा. मी सोबत येणार नाही. त्यामुळं कपालेश्वरी नंदी नाही.
त्याचा चांगला परिणाम म्हणजे नंदीचा पर्याय नाही. महादेव म्हणजे महादेव. त्याचं दर्शन अगदी होणार म्हणजे होणार.
अर्थात हे सारं झालं पुराणकाळात. आज तो काळ काही राहिलेला नाही. कालौघात सारंच काही बदलून जात असतं. तसंच इथंही झालेलं दिसून येतं.
परिणामी कपालेश्वरापासून जेमतेम दोनेक मैल अलीकडे वेगळीच तऱ्हा अनुभवायला येते. इथला महादेव म्हणे कायम गायबच असतो. अखेर तो कलियुगातलाच. त्यामुळं तो काही नंदीवर बसून भ्रमण करीत नाही. त्याला भ्रमणासाठी म्हणे कायम रेल्वेचं इंजीनच लागतं. मुळात इंजीन रेल्वेचं आणि महादेव कलियुगातला. तेव्हांं एका जागी दोघेही थोडेच थांबणार.
तरीही या कलियुगातल्या महादेवाचे दर्शनेच्छुक तसे खूप. ते येतात आणि देव्हारा रिकामा पाहून थबकतात. देव्हारा भले रिकामा असो पण देव्हाऱ्याच्या बाजूच्याच चौथऱ्यावर नंदी आपला ठाण मांडून बसलेलाच असतो. त्याला तसंही फार काही काम नसतं. पण तरीही महादेवाचे भक्तगण या नंदीकडे जायला तसे फार उत्सुक नसतात. कारण येणाऱ्या जाणाऱ्याला उगा ढुशा मारत राहण्याचा आणि आपली शिंगे उगारीत बसण्याचा त्याला म्हणे छंदच जडलेला असतो. तो आपणहून साऱ्या महादेवा दर्शनाभिलाषींना आपल्याकडं ओढून नेतो.
मी भले नंदी असेन पण ‘उप महादेवही आहे’ याची तो अभ्यागतांना राहून राहून आठवण करुन देत असतो.
महादेवालाही ही रचना पसंत पडलेली असते. मुळातच हा महादेव कलियुगातला. शाप वा अमृत कोणत्याही वाणीचा त्याला जात्याच कंटाळा. वाणीचा वापर करायचा म्हटलं की त्याचा अंगाचा म्हणे थरकाप होतो.
त्याउलट उपमहादेव उर्फ नंदी. सतत टिवटिवत राहणे त्याला अगदी मनापासून पसंत. हे टिवटिवणंदेखील स्वत:च्या चौथऱ्यावर शांत बसून नाही तर इकडे तिकडे सारखं हुंदडत राहून. हुंदडता हुंदडता मग कोणाला ढुशी मार, कुणाला शिंगावर घे, कुणाकडे मारकुट्या नजरेनं बघत रहा, हेदेखील अव्याहत सुरु.
आता आताशा भक्तगणही म्हणू लागलेत, यार ते कपालेश्वरांचं बरं आहे. तिथं नंदीचा काही सुडगुडाट नाही आणि इथं या नंदीच्या तापाखेरीज दुसरं काही नाही. जरा अदलाबदल झाली तर बरं
(महादेव आणि नंदी यांच्यावर योजलेल्या रुपकामुळे त्या दोहोंनी कृपा करुन कोप करु नये)