Nandini dies after being hit by lightning | विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या नंदिनीचा मृत्यू
विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या नंदिनीचा मृत्यू

ठळक मुद्देकेदार कुटुंबीयांनी तीघा सदस्यांना गमावल्याने परिसरात हळहळ उपचारादरम्यान तीचा रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू

नाशिक : नाशिक : सिडको येथील उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात २९ सप्टेंबर २०१९ रोजी घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकताना गच्चीपासून काही फूटांवर असलेल्या वीजतारांच्या विद्युतप्रवाहचा झटका लागून सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत गंभीरपणे जखमी झालेली नंदिनी शांताराम केदार उर्फ राणी (२३)हीचा उपचारादरम्यान रूग्णालयात रविवारी (दि.१७) मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवपुरी चौकात केदार कुटुंब वास्तव्यास असून या कुटुंबाची सून सिंधुबाई केदार (४०) गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या. त्यावेळी त्यांची सासू सोजाबाई (७५) या जवळच एका पलंगावर बसलेल्या होत्या. अचानकपणे सिंधुबाई यांना गच्चीजवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांच्या वीजप्रवाहचा झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यामुळे त्यांची सासू सोजाबाई यांनी सूनेच्या मदतीसाठी धाव घेतली मात्र त्यांनाही वीजप्रवाहचा धक्का बसल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू २९ सप्टेंबर रोजी झाला होता. या घटनेत वीजप्रवाहाशी संपर्क आल्याने नंदिणी सुमारे ५२ टक्के भाजली होती तर तीचा भाऊ शुभमदेखील (१९) जखमी झाला. आडगावच्या पवार वैद्यकिय महाविद्यालयात नंदिनीवर उपचार सुरू होते. तेथून पुन्हा काही दिवसांपुर्वीच नंदिनीला जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीचा रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या दुर्दैवी घटनेत केदार कुटुंबीयांनी तीघा सदस्यांना गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शांताराम केदार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आई, पत्नी गमावल्याच्या धक्क्यातून सावरण्याचा ते प्रयत्न करत असताना मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Nandini dies after being hit by lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.